देवरुख-मार्लेश्वर मार्गावर चिखलाचे साम्राज्य; दसऱ्याच्या दिवशीच पर्यटक अन् ग्रामस्थ रस्त्यात अडकले
देवरुख ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे प्रवाशांचे अन् पर्यटकांचे अतोनात हाल होत आहेत. सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावर ठिकठिकाणी माती वाहून आल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी तर थेट फूटभर चिखल साचल्याने वाहने फसून आणि रुतून बसली आहेत. परिणामी, काल रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
विजयादशमीचा पावन सण असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री देव मार्लेश्वराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मात्र, देवरुख – मार्लेश्वर मार्गावर वाहने अडकून पडल्याने अनेक भक्त आणि स्थानिक ग्रामस्थ रस्त्यातच अडकले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देवाला जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाची किंवा संबंधित ठेकेदाराची कोणतीही यंत्रणा किंवा जेसीबी मशीन रस्ता साफ करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईबाबत नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालत या मार्गावरील चिखल हटवावा आणि रस्ता वाहतुकीसाठी तात्काळ मोकळा करावा, अशी आक्रमक मागणी पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Comments are closed.