ठाण्यात महापौरांच्या ड्रायव्हरचा चॅनेलच्या कॅमेरामनवर हल्ला, पालिकेच्या आवारातच गुंडगिरी शिवीगाळ करत गळा दाबला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकारांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज शिंदे गटाच्या ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या चालकाने थेट वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवरच हल्ला केला. या चालकाने कॅमेरामन विनय राजभर यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली, त्यांचा गळाही दाबला. गुंडगिरी करणारा महापौरांचा ड्रायव्हर सुनील खरपडे याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या आवारात एबीपी माझा या वृत्तवाहिनीची गाडी उभी असताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचा चालक सुनील खरपडे याने तेथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचा जाब या वृत्तवाहिनीचे कॅमेरामन विनय राजभर याने विचारला. यावेळी खरपडेने थेट राजभर यांची कॉलर पकडून त्यांचा गळा आवळत मारहाण केली. महापौरांच्या चालकाच्या गुंडगिरीचे व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरपडेला कारणे दाखवा नोटीस

महापौर पिंपळोलकर यांचा चालक सुनील खरपडे याला ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

Comments are closed.