सकाळी उठल्यावर लगेच चहा पिता? थांबा!

सकाळी डोळे उघडल्यावर अनेकांना सर्वात आधी आठवण येते ती वाफाळत्या चहाची! काही जणांना चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच झाल्यासारखी वाटत नाही. तर काहींच्या दिवसाची सुरुवात बेड टीनेच होते. मात्र, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का, याचा कधी विचार केला आहे का? चहामध्ये असणारे कॅफिन आणि त्यातील इतर घटक काही लोकांमध्ये अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अस्वस्थता वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी चहा पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

लगेच चाहा पिणे टाळा
रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे उठल्यानंतर आधी थोडे पाणी प्या आणि त्यानंतर चहा घ्या. प्रत्येकाने चहा पिण्यापूर्वी ठरावीक वेळ थांबलेच पाहिजे, असा नियम नाही. मात्र, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्रास होत असेल, तर ही सवय बदलणे फायदेशीर ठरू शकते.

अॅसिडिटीचा त्रास
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानंतर काहींना पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या जाणवू शकतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर चहा पिण्यापूर्वी हलका नाश्ता करून पाहा. त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नाश्त्याकडेही लक्ष द्या
सकाळी चहा प्यायल्यानंतर अनेक जण बराच वेळ काहीच खात नाहीत. मात्र, केवळ चहावर सकाळ काढणे योग्य नाही. आपल्या दिनक्रमानुसार पोहे, उपमा, इडली, अंडी किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा नाश्ता करा. चहा हा नाश्त्याचा पर्याय नाही, हे लक्षात ठेवा.

चहा पिणे प्रत्येकासाठी वाईट नाही. मात्र, किती चहा पिता, त्यामध्ये किती साखर असते आणि चहा प्यायल्यानंतर शरीराला कसे वाटते, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर आधी पाणी प्या, संतुलित नाश्ता करा आणि त्यानंतर आपल्या प्रकृतीनुसार चहाचा आस्वाद घ्या.

Comments are closed.