ऑफिसमध्ये तासनतास बसून पाठ दुखतेय?




कार्यालयात पाठदुखी


बहुतांश लोकांना दिवसभरात 8 ते 10 तास एकाच जागेवर बसून काम करावे लागते. सतत स्क्रीनसमोर बसून राहिल्यामुळे मानदुखी, कंबरदुखी आणि पाठीच्या त्रासाने अनेकजण त्रस्त असतात. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या शारीरिक समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुमच्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे ताडासन (Tadasana).  अवघ्या 10 मिनिटांचा हा योगाभ्यास तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतो.

कसे करावे ताडासन?

  • योग्य स्थिती – ताडासन करण्यासाठी सर्वप्रथम ताठ उभे राहा आणि दोन्ही पाय एकत्र ठेवा.

  • हात वर करणे – तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर न्या आणि बोटे एकमेकांत गुंफा.

  • शरीर ताणणे – आता दोन्ही पायांच्या टाचा हळूहळू वर उचला आणि संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणा.

  • श्वासोच्छ्वास -या स्थितीत 10 ते 20 सेकंद तसेच राहा आणि सामान्यपणे श्वास घेत राहा.

  • पुनरावृत्ती – सुरुवातीला हा योगासनाचा सराव 3 ते 5 वेळा करावा. शरीराची लवचिकता आणि क्षमता वाढल्यानंतर वेळ हळूहळू वाढवू शकता.

ताडासनाचे फायदे

  • पाठीच्या कण्याला आराम – शरीर वरच्या दिशेने ताणल्यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या स्नायूंना स्ट्रेच मिळतो. ज्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.

  • पोश्चर सुधारते – दिवसभर एकाच स्थितीत बसल्यामुळे शरीराचा आकार बिघडतो. ताडासनामुळे शरीर सरळ ठेवण्याची सवय लागते आणि पोश्चर सुधारण्यास मदत होते.

  • बॅलन्स –  हे आसन करताना संपूर्ण शरीराचे वजन पायाच्या टाचांवर किंवा नखांवर ठेवावे लागते, ज्यामुळे शरीराचा बॅलन्स वाढतो.

  • पाय मजबूत होतात – पायांवर आणि घोट्यांवर पडणाऱ्या दाबामुळे पायांचे स्नायू बळकट होतात.

  • मानसिक एकाग्रता – ताडासन करताना श्वास आणि शरीराच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करावे लागते, ज्यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

महत्त्वाची टीप

जर तुम्हाला सांधेदुखीचा किंवा शरीराच्या इतर भागांत गंभीर त्रास असेल, तर योगासने करताना योग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हेही वाचा – स्लिम दिसणे म्हणजे फिट आहात असे नाही



Comments are closed.