मस्करीची होऊ शकते कुस्करी, सांभाळा मर्यादा





“मस्करीची होऊ शकते कुस्करी” ही मराठीतील एक मार्गदर्शक म्हण आहे. याचा सोपा अर्थ असा होतो की, कधीकधी आपण केलेला साधा- विनोद किंवा मस्करी सुद्धा गंभीर वादात किंवा भांडणात बदलू शकते. जसे की ज्यावेळी सगळे आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकत्र येतात तेव्हा गप्पांबरोबर थट्टा मस्करी केव्हा सुरू होते कळत नाही. पण काहीवेळा ही मस्करी, चेष्टा, थट्टा जेव्हा पर्सनल होते त्यातील मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा मात्र त्यातील मस्करी हेतू संपतो आणि त्या गप्पांमधून वाद सुरू होतात. कधी कधी या वादात मन दुखावल्याने नात्यात कायमचा दुरावाही येतो.
यामुळे थट्टा मस्करी करतेवेळी मर्यादाही सांभाळायला हवी. त्यासाठी कोणत्या गोष्टींचे भान राखावे ते बघूया.

शब्द जपून वापरणे

विनोद किंवा मस्करी ही केवळ आनंद निर्माण करण्यासाठी असावी, कोणाला दुखावण्यासाठी किंवा अपमानित करण्यासाठी नाही. त्यामुळे मस्करी करताना नेहमी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि परिस्थितीचा विचार करूनच जपून शब्द वापरावेत.

वयाचे भान

बऱ्याचवेळा मज्जा मस्तीत आपण समोरच्याचे वयच विसरून जातो. कारण विनोदातून आनंद मिळत असल्याने तो क्षण सगळ्याच गोष्टींचा विसर पाडतो. पण समजा तुम्ही एखाद्या वयस्क व्यक्तीची मस्करी करत आहात आणि सगळेच त्याचा आनंद घेत असतील पण आपली अशी सार्वजनिक थट्टा त्या व्यक्तीला अभिप्रेतच नसेल तर तिचे मन दुखावते. वयाने लहान व्यक्तीकडून होणारी आपली चेष्टा त्या व्यक्तीच्या सन्मानाला धक्का लावू शकते. यामुळे वयाचे भान ठेवूनच बोलावे.

असहायतेची चेष्टा

काही जणांना दुसऱ्याच्या असहायतेची चेष्टा करण्यात आनंद मिळतो. पण खरं तर एखाद्याच्या परिस्थितीवरून त्याची चेष्टा करणे ही मस्करी नाही. तर त्याला कमी लेखण्याचा अपमानित करण्याचा प्रयत्न आहे. कारण मस्करी मध्ये दोन्ही व्यक्ती गप्पांचा आनंद घेतात.

संवेदनशील मुद्दे

बऱ्याचवेळा काही संवेदनशील मुदद्यावर चर्चा सुरू होतात. त्यातून थट्टा, मस्करी होते. पण काहीवेळा या थट्टेतून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावनेवर तर घाला घालत नाही आहात ना हे पण समजायला हवे.कारण या विनोदाच्या आड नकळत नाते बिघडू शकते.



Comments are closed.