सिडकोतील बजरंग चौकात हत्येचा थरार…अगोदर कारने धडक दिली, नंतर जखमी तरुणावर पुन्हा दांड्याने केले वार

सिडको एन-7 परिसरातील बजरंग चौकात आज बुधवारी सकाळी हत्येचा थरार पाहून एकच खळबळ उडाली आहे. कारने मोपेडला जोराची धडक दिल्याने मोपेडवरून तरुण हवेत फेकल्या गेल्यानंतर रस्त्यावर कोसळला. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला कारमधून उतरून लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (36) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येनंतर आरोपी पवन दिलीप पराशर (22,वानखेडेनगर) याने पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बंटी हा नेहमीप्रमाणे जिम संपवून आपल्या मोपेड दुचाकीवरून घरी जात होता. त्याच्या दुचाकीचा पाठलाग आरोपी पवन पाराशर याने कारने सुरू केला होता. बंटीची दुचाकी एन-७ सिडको परिसरातील मंगेश गॅस एजन्सीजवळ आला. त्यावेळी त्याच्या पाठीमागून पाठलाग करत असलेल्या पाराशरने अचनाक गाडीचे वेग वाढवित बंटीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे बंटी हवेत उंच उडून रस्त्यावर कोसळला होता तर त्याची दुचाकी जवळपास 150 फुटांवर समोर घसरत गेली. रस्त्यावर पडलेला बंटी हा गंभीर जखमी झालेला असताना पवन पराशर याने कार समोरून वळवून पुन्हा बंटी जखमी पडलेल्या ठिकाणी घेऊन आला. त्यानंतर कारमधून उतरून जखमी अवस्थेत पडलेल्या बंटीवर लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

पाळत ठेवून केली हत्या

बंटी व आरोपी पराशर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद झाला होता. या वादातून ही टोकाची भुमिका घेतली आहे. बंटीच्या हत्येपुर्वी त्याच्या नियोजनावर पाळत ठेवली होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवरून तो जीममधून एकटाच जात असल्याने यावेळी हल्ला करून त्याला संपविण्याची योजना पराशर याने आखली होती. त्यानुसार त्याने आज बुधवारी पाळत ठेवून हत्या घडवून आणली.

हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

कारने धडक देऊन बंटीची निर्घुण हत्या करुन आरोपी पराशर हा आपली कार घेऊन थेट सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांची धांदल उडाली. पोलिसांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अतुल येरमे यांनी ठाण्यात व घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडे आलेल्या आरोपीकडून अधिकची माहिती पोलीस घेत असून हत्यामागचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, बंटी व आरोपी हे दोघे मित्र असून त्यांच्यात व्यवसायिक वाद असल्याची चर्चा आहे. त्यात बंटीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहे. तर हत्या करणार्‍या आरोपी हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची चर्चा आहे.

संकेत कुलकर्णी हत्याकांडाची आठवण

मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संकेत संजय कुलकर्णी या विद्यार्थ्याची दि. २३ मार्च २०१८ रोजी भर दुपारी कामगार चौकात संकेत कुलकर्णी याच्या अंगावर कार ५ ते ६ वेळा घालून हत्या करण्यात आली होती. बंटी दिक्षित हत्याकांडाने पुन्हा एकदा संकेत कुलकर्णी घटनेची आठवण करून दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हत्यामागील कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments are closed.