चंद्रपूरच्या जंगलात वाघीण आणि बछड्यांची धमाल, कॅमेऱ्यात कैद झाला मायेचा अनोखा क्षण
जंगलाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा आपल्या बछड्यांसोबतचा मायेचा आणि मस्तीचा अनोखा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कारवा जंगलात सफारीदरम्यान वन्यजीव छायाचित्रकार जतिन पटेल यांनी हा देखणा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला. या दृश्यांमध्ये वाघीण आपल्या बछड्यांसोबत रममाण झाल्याचे दिसत आहे. बछडे एकमेकांवर झेपावत, खोड्या काढत खेळण्यात मग्न आहेत. तर त्यांची आई कधी त्यांना प्रेमाने गोंजारताना, तर कधी हलकीशी चपराक मारून त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करताना दिसते. शिकारीसाठी नेहमी सतर्क असणाऱ्या वाघिणीचा हा प्रेमळ आणि ममत्वाने भरलेला अंदाज वन्यजीवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. वाघाच्या कुटुंबातील हा नैसर्गिक आणि निखळ आनंदाचा क्षण जंगलातील वन्यजीवांच्या भावविश्वाची सुंदर झलक दाखवतो. जतिन पटेल यांनी टिपलेली ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत असून, वाघिणीचे मातृत्व आणि बछड्यांची निरागस मस्ती पाहून वन्यजीवप्रेमी भारावून जात आहेत.
Comments are closed.