विसर्जन व्यवस्थेतील त्रुटी भोवल्या, ठाणे पालिकेचे तीन अधिकारी निलंबित; दोघांना कारणे दाखवा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवरात्रोत्सवाच्या विसर्जनवेळी मासुंदा तलाव येथे ढिसाळ नियोजन व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर व कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांचा समावेश आहे. तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी व सुरक्षा विभागाचे प्रमुख घनश्याम फर्डे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मासुंदा तलाव परिसरातील दत्त मंदिर घाट व अहिल्यादेवी घाटावर पालिकेच्यावतीने देवी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती. या विसर्जन घाटावरील देखरेख ठेवण्यासाठी कार्यालयीन आदेशानुसार पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. घाट परिसरातील सुरक्षा व्यवस्था व आवश्यक उपाययोजनांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र विसर्जनाच्या दिवशी नियुक्ती करण्यात आलेले पालिकेचे अधिकारी घाटावर उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी ३ अधिकाऱ्यांचे निलंबन तर दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निलंबनाच्या कालावधीत अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालयात कार्यरत राहावे लागणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.

Comments are closed.