संजय गांधी उद्यानातील शिकारीचे गूढ; दोन छर्रे, अर्धवट जळालेला मोबाईल सापडला, स्मशानातील राखेतून उलगडणार गोळीबाराचे रहस्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संजय गांधी उद्यानात रात्री झालेल्या शिकारीचे गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे. स्मशानातील राखेतून गोळीबाराचे रहस्य कळणार असून पोलिसांनी दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त केला आहे. त्यामुळे तपासाच्या कामाला गती मिळणार आहे. संजय गांधी उद्यानात बंदी असूनही मनमानीपणे शिकार होत असल्याच्या घटना घडत आहेत. १९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या शिकारीची सध्या कसून चौकशी सुरू असून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चार दिवसांपूर्वी रात्री ९.३० च्या सुमारास सातजणांची टोळी शिकार करण्यासाठी गेली होती. डोंगरावरून उतरताना मोबाईलचा प्रकाश दिसल्याने वन्यप्राण्याचे डोळे असल्याचा समज करून महेश गायकर याने गोळीबार केल्याचा आरोप आहे.

बंदुकीतील छरे विजय सापटे यांच्या छातीला आणि पायाला लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत कल्पेश डगला आणि कुणाल शेलार हे दोघेही जखमी झाले. धक्कादायक म्हणजे विजय सापटे यांच्या मृतदेहावर पोलिसांना न सांगताच अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना न देता विजय सापटे यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे मृतदेह दाखवून संबंधितांकडून मृत्यूची कागदपत्रे मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास चेना गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे डाग असलेली पाने, दगड, छरे, चप्पल, रायफलचा भाग आणि छऱ्यांची बंदूक जप्त केली.

डॉक्टरला नोटीस

शिकारप्रकरणी महेश गायकर, रोहित सापटे, कल्पेश डगला, कुणाल शेलार, काठोड लाबड, प्रवीण जाधव आणि डॉ. राजेश पालांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गायकर आणि काठोड लाबड यांना अटक करण्यात आली असून त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. पालांडे यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असून त्यांना नोटीस देण्यात आल्याचे समजते.

Comments are closed.