Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यात कीड लागलेल्या धान्याचे वितरण; गरिबांच्या आरोग्याशी खेळ सुरूच, ग्रामस्थांचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शासनाकडून रेशन दुकानांद्वारे पुरवठा करण्यात येणारे धान्य हे गोरगरीब कुटुंबांसाठी मोठा आधार मानले जाते. मात्र, सद्यस्थितीत वितरीत केले जाणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे, खराब आणि कीड लागलेले असल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावात उघडकीस आला असून, नागरिकांना थेट कीड लागलेले धान्य वाटले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे धान्य मानवी खाण्यासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

​बोंड्ये गावातील रेशन दुकानात धान्य वाटप सुरू असताना धान्यामध्ये कीड लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यावेळी उपस्थित असलेल्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांनी तातडीने यावर तीव्र आक्षेप घेतला आणि निकृष्ट दर्जाचे धान्य गरिबांच्या माथी मारले जात असल्याबाबत जाब विचारला. ​मात्र, रेशन दुकानदाराकडून “वरच्या पातळीवरूनच (गोदामातून) असा माल आला आहे, आम्ही केवळ त्याचे वितरण करत आहोत,” असे सांगून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. वरिष्ठ प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे गोरगरिबांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

​आरोग्याशी खेळ का? कीड लागलेले आणि कुजलेले धान्य खाऊन आजारपण पसरल्यास त्याला जबाबदार कोण? धान्य तपासणी कुठे जाते? शासकीय गोदामांमधून धान्य बाहेर पडताना त्याची गुणवत्ता तपासली जात नाही का? निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवणाऱ्या जबाबदार पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी बोंड्ये ग्रामस्थ आणि माजी सरपंच ललिता गुडेकर यांनी केली आहे.

Comments are closed.