आमदार हेमंत पाटील यांची शेतकऱ्याला शिवीगाळ, कारवाईची दिली धमकी
मिंधे गटाचे आमदार हेमंत पाटील यांना फोन लावून पिंपळगाव येवला (ता. लोहा) येथील एका शेतकऱ्याने दुष्काळाच्या प्रश्नावर आणि रामदास कदम यांच्या वक्तव्यावर जाब विचारला. त्यानंतर आमदारांनी त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत कारवाईची धमकी दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
नांदेडमधील मिंधे गटाचे आमदार हेमंत पाटील यांना पिंपळगाव येवला (ता. लोहा) येथील भगवान बाबुराव येवले या शेतकऱ्याने फोन लावला होता. “दुष्काळाची परिस्थिती बिकट आहे, त्याकडे आपण लक्ष घालावे. तसेच रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर तुमचे काय म्हणणे आहे? आमचे दैवत असलेल्या मनोज जरांगे यांना कदम यांनी शिवीगाळ करून त्यांच्या चौकशीची मागणी केली, हे योग्य आहे का? यावर तुमचे मत काय?” असे विचारल्यानंतर खवळलेल्या आमदार हेमंत पाटील यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “शेतीत लक्ष घाल, काही कामधंदे नाहीत का?” असे म्हणत अश्लील शिवीगाळही केली. यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आमदारांनी आई-बहिणीवरून येवले यांना शिवीगाळ करत, “तू समोर तर ये, तुला दाखवतो,” अशी धमकीही दिली. यानंतर येवले यांनी सदरची क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल केली. त्यानंतर काल रात्री आमदारांनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोनखेडच्या पोलिसांनी येवले यांना कॉलर धरून घरातून उचलून नेले. सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी आमदारांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. दोन कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्डची फौज येवले यांच्या घरात पाठवून, त्यांना साधी चप्पलही घालू न देता कॉलर पकडून सोनखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली. विशेष म्हणजे ही मारहाण करताना पोलिसांनी हेमंत पाटलांना फोन करून, “आम्ही त्यांचा समाचार घेतला,” असे सांगितले.
पोलिसांनी येवले यांना “आमदारांची माफी माग, नाहीतर तुझे काही खरे नाही,” असे धमकावले. पोलिसांच्या मारहाणीमुळे असह्य झालेल्या येवले यांनी फोनवरच आमदारांची माफी मागितली. त्यानंतर आज त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून त्यांच्याकडून कोऱ्या बाँडवर सही घेण्यात आली; तसेच त्यांचा खोटा व बनावट जबाब जबरदस्तीने लिहून घेण्यात आला.
हा सगळा प्रकार झाल्यानंतर येवले म्हणाले की, “माझ्याकडे पुरावे असताना व आमदारांनी शिवीगाळ केली असतानाही पोलिसांनी मला जबरदस्तीने उचलून आणून मारहाण केली. माझे काही बरेवाईट झाल्यास त्याला आमदार हेमंत पाटील व सोनखेड पोलीस जबाबदार असतील.” याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिंधे गटाच्या आमदारांनी केलेली शिवीगाळ व त्यानंतर पोलिसांनी दाखवलेली अति-तत्परता सध्या चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
Comments are closed.