राफेल आणि सुखोई विमानांच्या नेत्रदीपक युद्धाभ्यास

पंतप्रधानांच्या उपस्थितीत वाराणसीमध्ये ‘एअर शो’ :  हवाई दलाच्या 100 विमानांचा सहभाग

वृत्तसंस्था/ वाराणसी

पंतप्रधान मोदींनी रविवारी वाराणसीतील नमो घाट येथे एअर शोला हजेरी लावली. या शोमध्ये 100 विमानांनी सहभाग घेतला होता. यामध्ये राफेल आणि सुखोईसह 52 लढाऊ विमानांनी लक्षवेधी आणि चित्तथराराक कसरती सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एसयू-30, राफेल, जॅग्वार, मिराज 2000, एलसीए तेजस आणि मिग-29 या सहा लढाऊ विमानांनी एकाचवेळी उ•ाण करून आपली क्षमता, वैमानिकांचे कौशल्य आणि उत्कृष्ट समन्वय प्रदर्शित केला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावर भारतीय हवाई दलाची शक्ती आणि लढाऊ क्षमता दर्शविणाऱ्या एका भव्य हवाई प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नमो घाट येथे आयोजित हे हवाई प्रदर्शन भारतीय हवाई दलाच्या ‘विंग्स ओव्हर गंगा’ कार्यक्रमाचा एक भाग होते. हवाई दलाच्या 94 वर्षांच्या सेवेच्या स्मरणार्थ गुरुवारी सुरू झालेला हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. पंतप्रधान मोदींसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या हवाई प्रदर्शनाला हजेरी लावली होती.

या हवाई प्रदर्शनात भारतीय वायुदलाची हवाई शक्ती आणि ड्रोन व मानवरहित हवाई वाहनांच्या युगात ते रणांगणासाठी स्वत:ला कसे तयार करत आहे, याचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष लढाऊ विमानांची रचना, हवाई लढाईचे प्रात्यक्षिक, प्रगत सेन्सर तंत्रज्ञान आणि हवाई कसरती यांचा समावेश होता. 12 हवाई तळांवरील विमाने आणि तिन्ही दलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन याप्रसंगी घडवण्यात आले. या कार्यक्रमात सुखोई एसयू-30 एमकेआय आणि राफेलसह 12 हवाई तळांवरील जवळपास 100 विमानांनी भाग घेतला होता. याव्यतिरिक्त हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमाने देखील प्रदर्शित करण्यात आली होती. भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल यांच्यातील घनिष्ठ समन्वय दर्शवणे हा या हवाई प्रदर्शनाचा एक उद्देश होता.

या प्रात्यक्षिकात विमानांचा वेग, मोहिमांदरम्यान रचना टिकवून ठेवण्याची क्षमता आणि समन्वय यावर भर देण्यात आला. या प्रात्यक्षिकात प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या विमानांचाही समावेश होता. याशिवाय, गेल्या वर्षीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान वापरलेल्या काही शस्त्रास्त्रांची क्षमताही या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. याप्रसंगी हवाई लढाऊ डावपेचांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

मालवीय पुलावरून अतिवेगवान हल्ला करणाऱ्या दोन जॅग्वार विमानांना रोखण्याचा सराव एका एसयू-30 विमानाने केला. ‘सूर्य किरण’ अॅक्रोबॅटिक टीम आणि ‘सारंग’ हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमच्या हवाई कसरतींच्या प्रदर्शनाने एअरशोची सांगता झाली. सूर्य किरण टीमने आपल्या अचूक रचना आणि हवाई कसरतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तर सारंग टीमने आपल्या हेलिकॉप्टरची उ•ाण क्षमता आणि वैमानिकांमधील उत्कृष्ट समन्वय दाखवून दिला.

Comments are closed.