नांदी सिंहस्थ कुंभमेळ्याची… गोदाघाटावर विश्वविक्रमी शंखनाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिंहस्थ महाकुंभ महापर्वाच्या ध्वजारोहणानिमित्त आज रविवारी, 25 ऑक्टोबरला गोदाघाटावर 517 वादकांनी शंखनाद करून विश्वविक्रमावर हिंदुस्थानचे नाव कोरले. कोजागरी पौर्णिमेला झालेल्या या शंखांच्या मंगलध्वनींनी आसमंत निनादून गेला होता. अमेरिकेचा 303 शंखनाद वादनाचा विक्रम आज हिंदुस्थानने मोडीत काढला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी अभिनंदन करीत नव्या विश्वविक्रमाची घोषणा करताच पवित्र गोदावरी घाट ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. हा सोहळा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या मंगलपर्वाची नांदी ठरला आहे.

आज कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून यशवंत महाराज पटांगणावर या महाशंखनाद विश्वविक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी शंख वादकांमध्ये12 ते 82 वर्षे वयोगटातील मुले, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता.

कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचलित अनंत विजय शंखनाद पथकाच्या माध्यमातून गोदाघाटावर 517 वादकांनी पाच मिनिटे झांज व संबळाच्या तालावर शंखनाद करून हा विश्वविक्रम हिंदुस्थानच्या नावावर प्रस्थापित केला. आला. या विक्रमासाठी वादकांनी सातत्याने दोन महिने कसून सराव केला आहे. श्रीरामकुंडावर होणाऱया गोदाआरतीपूर्वी झालेल्या या सामूहिक शंखनादामुळे सर्वत्र चैतन्याची अनुभूती पसरली होती.

Comments are closed.