ऊसदरासाठी कोल्हापुरात शेतकऱ्यांची दुचाकी रॅली, दिवसभरात 185 कि. मी.चा टप्पा केला पार
ऊसउत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात प्रतिटन 4500 रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यात शेतकऱ्यांची दुचाकी जनजागृती रॅली काढण्यात आली. दिवसभरात 185 कि.मी.चा टप्पा पार करत या रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.
हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात झाली. शेकडो शेतकरी दुचाकीसह हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते. ‘पहिली उचल 4 हजार 500 रुपये मिळालीच पाहिजे,’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. रॅली हातकणंगले येथून कुंभोज, नरंदे, सावर्डे, वडगाव, वठार, वारणानगर, वाघबीळ, आसुर्ले पोर्ले, खुपिरे, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, बिद्री, वाळवे, सिद्धनेर्ली आणि कागल या प्रमुख गावांमधून मार्गस्थ झाली. कसबा सांगाव येथे या भव्य रॅलीची सांगता झाली.
Comments are closed.