500 कोटींची क्लिप खोटी ठरविण्याचा प्लान, मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबत आज आणखी एक खळबळजनक दावा केला. या क्लिपमुळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या पायाखालची जमीन सरकली असून, आता ही क्लिपच खोटी ठरवण्याचे षड्यंत्र पडद्यामागून सुरू आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत या क्लिपबाबत पुन्हा नवी माहिती दिली. काहीही करून ही क्लिप खोटी ठरवायची यासाठी भाजप आणि शिंदे गटाची धावाधाव सुरू असल्याची कुजबुज आपल्या कानावर आली आहे. सत्तेत राहण्यासाठी सत्य दाबले जात आहे. दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. पैसे कुठून आणले, का आणले यासारखे अनेक प्रश्न सरकारसमोर उभे राहणार आहेत. खूप मोठे षड्यंत्र राज्यासमोर येईल, त्यामुळे नॅरेटिव्ह सेट करून, वातावरण निर्मिती करून ही क्लिप बदनाम करण्यासाठी, खोटी ठरवण्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

दोष–प्रत्यारोप का बंद केले

क्लिप बाहेर आल्यानंतर दोन दिवस एकमेकांवर आरोप करणारे भाजप व शिंदे गटाचे नेते आता अचानक गप्प बसले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. आरोप-प्रत्यारोप बंद करा अशा सूचना त्यांना आल्या आहेत. या लोकांना सत्य दाबून ठेवायचे आहे. म्हणजेच ही क्लिप खरी असल्याचे सिद्ध झाले असून आता आपल्याविरोधात षड्यंत्र रचले जात आहे, पण कितीही खोटे ठरवले तरी समाजासमोर सत्य आणणारच, असा इशारा जरांगे यांनी दिला.

समाजाने ज्याला मोठे केले तोच त्रास देतोय

एकनाथ शिंदे यांना केवळ सत्ता भोगायची आहे. मराठा समाजाचा माणूस मोठा झाला पाहिजे यासाठी आम्ही जिवाचे रान केले. आज त्याच माणसाकडून आम्हाला त्रास व्हावा ही किती मोठी शोकांतिका आहे. आम्ही काय पाप केले, असा सवाल करत जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीस त्यांना वाचवत असतील तर तेच हे सर्व करत होते का?

क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत हे स्पष्ट होऊनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. त्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले की, फडणवीस त्या लोकांना वाचवत असतील तर फडणवीस हेच हे सर्व कारस्थान करत होते का, हे त्यांनी स्पष्ट करावे. आता आपण शांत बसणार नाही. सत्य समोर आणत राहणार, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Comments are closed.