हार्दिक पंड्याला 'या' संघात कर्णधारपदाची संधी मिळू शकते, रविचंद्रन अश्विनचं वक्तव्य चर्चेत
मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) हार्दिक पंड्याचा (Hardik pandya) प्रवास पुढेही सुरू राहणार की, तो नव्या संघाच्या जर्सीत दिसणार, याबाबत आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी चर्चा सुरू झाली आहे. हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझींची नावे चर्चेत आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) अशा एका संघाचे नाव सांगितले आहे, जिथे हार्दिकला खेळण्यासोबतच कर्णधारपदाची संधीही मिळू शकते. अश्विनच्या मते, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) हा हार्दिकसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
हार्दिकचा जुना संघ असलेल्या गुजरात टायटन्सबाबतही अश्विनने एक महत्त्वाची सूचना केली आहे. गुजरात टायटन्स हार्दिकच्या बदल्यात राशिद खानला मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड करू शकते, अशी शक्यता त्याने व्यक्त केली. याशिवाय, राजस्थान रॉयल्सच्या संभाव्य पर्यायांमध्ये यशस्वी जयस्वाल (Yashsvi Jaiswal & Sam Curren) आणि सॅम करन यांचाही उल्लेख केला.
अश्विनच्या मते, मुंबई इंडियन्सला एका भारतीय यष्टिरक्षकाची गरज आहे. त्याचबरोबर संघाला आपल्या गोलंदाजीची बाजूही मजबूत करावी लागेल. हार्दिकला आपल्या संघात घेण्याच्या संभाव्य शर्यतीत अश्विनने चेन्नई सुपर किंग्स (CSK), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्स (PBKS) या पाच संघांची नावे घेतली. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता त्याने फेटाळून लावली.
अश्विनच्या मते, पुढील संघात हार्दिकला कर्णधारपद मिळणे आता आवश्यक नाही. हार्दिक स्वतःसाठी योग्य संघ निवडण्याला प्राधान्य देऊ शकतो. मात्र, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यापुढे हार्दिकबाबत मुंबई इंडियन्स नेमकी काय भूमिका घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
Comments are closed.