टीम इंडियाला आता प्रयोगांची संधी; न्यूझीलंडसमोर सन्मान वाचवण्याचे आव्हान
पाच सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका 3-0 अशी आधीच खिशात घातल्यानंतर टीम इंडियाने मनोबल उंचावले आहे. आता उर्वरित दोन सामन्यांत विजयाची घोडदौड कायम ठेवतानाच नव्या खेळाडूंना संधी देण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, हिंदुस्थानी फलंदाजांच्या वादळापुढे निष्प्रभ ठरलेल्या न्यूझीलंडला पराभवाची मालिका रोखण्याचे आव्हान आहे. ऑकलंडच्या ईडन पार्कवर शुक्रवारी होणाऱया चौथ्या टी-20 सामन्याकडे त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाने 199 धावांचे लक्ष्य अवघ्या 13.2 षटकांत पार केले. आता ईडन पार्कची छोटी सरळ सीमारेषा पाहता पुन्हा एकदा चौकार-षटकारांची आतषबाजी होण्याची शक्यता आहे. मालिका आधीच जिंकल्यामुळे हिंदुस्थानकडे संघात प्रयोग करण्याची मोकळीक आहे. अद्याप एकही सामना न खेळलेल्या कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांना संधी मिळू शकते. आगामी एकदिवसीय आणि कसोटी मालिकांचा विचार करून प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचाही पर्याय आहे. मयांक यादवच्या पुनरागमनाबाबतही उत्सुकता आहे, मात्र दुखापतीतून सावरणाऱया ईशान किशनच्या उपलब्धतेबाबत स्पष्टता नाही.
अर्शदीप, सॅण्टनर दीडशे बळींचा टप्पा गाठणार
हिंदुस्थानचा अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅण्टनर यांना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी एका विकेटची गरज आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी संघातील पर्याय तपासण्याची, तर न्यूझीलंडसाठी प्रतिष्ठा राखण्याची ही लढत ठरणार आहे.
किवींच्या अडचणी वाढल्या!
न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. मॅट हेन्री आणि झॅक फॉल्क्स हे गोलंदाजही दुखापतींमुळे त्रस्त आहेत. फर्ग्युसनच्या जागी मॅट फिशरचा समावेश करण्यात आला आहे.
हिंदुस्थानचा संभाव्य संघ –
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (नेता), टिळक वर्मा, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी/ शिवम दुबे, अक्षर पटेल/ प्रिन्सवर्मा वरुपाने याकरव/ यादव, अर्शदीप सिंग/ मयंक यादव.
न्यूझीलंडचा संभाव्य संघ –
फिन ऍलन, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सॅण्टनर (कर्णधार), ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅट फिशर, ब्लेअर टिकनर / नॅथन स्मिथ.
Comments are closed.