‘आनंदाचा शिधा’ पुन्हा सुरू करा! शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची रेशनिंग नियंत्रकांकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या कठीण काळात रेशनिंग योजनेच्या माध्यमातून जनतेला मोठा दिलासा मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने निवडणुकांपूर्वी राबवलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना दिवाळीत पुन्हा राबवावी आणि गरजूंना याचा प्रत्यक्ष लाभ द्यावा, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस निखिल सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रेशनिंग नियंत्रक चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. 60 हजारांच्या उत्पन्नाची अट रद्द करून ती वाढवण्याची मागणी विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणे दाखवून अनेक पात्र लाभार्थींना रेशनिंग योजनेतून बाहेर काढल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला.

सध्या असलेली वार्षिक 60 हजार रुपये उत्पन्नाची अट वाढवून किमान 1,30,000 किंवा त्याहून अधिक करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निखिल सावंत यांनी रेशनिंग नियंत्रकांकडे केली. तसेच रेशनिंग विभागाने स्वतः पुढाकार घेऊन ही ई-केवायसी प्रक्रिया सुलभ रीतीने पूर्ण करून द्यावी, अशी मागणी केली. या शिष्टमंडळात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे, समीर हडकर, ऍड. हर्षल साळवी, किरण काळे, यशवंत खोपकर, बळीराम मोसमकर तसेच कार्यालय प्रमुख विजय पवार आणि शेखर यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रेशनिंग नियंत्रकांकडून सकारात्मक प्रतिसाद

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत रेशनिंग नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले की, रेशनिंग विभागाने उत्पन्नाची अट दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याबाबत अहवाल यापूर्वीच शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. तसेच ई-केवायसी व इतर अडचणींवर योग्य ती उपाययोजना करण्याचे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले.

Comments are closed.