बेकायदा बांधकाम सुरू असताना महापालिका ढाराढूर झोपेत! चिकलठाण्यातील ‘त्या’ बांधकामाला कुणाचे संरक्षण?
चिकलठाणा परिसरात अवाढव्य स्लॅब कोसळल्याच्या घटनेला २४ तास उलटून गेले तरी दबलेल्या मजुराचा अजूनही शोध लागलेला नसतानाच हे संपूर्ण बांधकामच बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कालबाह्य परवानगीवरच हे बांधकाम सुरू असताना महापालिका चक्क ढाराढूर झोपली होती! त्यामुळे संबंधित कंत्राटदारासोबतच महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
चिकलठाणा परिसरात अगदी हमरस्त्यावर एका निर्माणाधीन इमारतीचा अवाढव्य स्लॅब गुरुवारी सायंकाळी कोसळला. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना १६ जण त्याठिकाणी काम करत होते. त्यापैकी चार जण प्रत्यक्ष स्लॅबखाली काम करत होते. अचानक स्लॅब कोसळला. प्रसंगावधान राखून तीन जणांनी उड्या मारून जीव वाचवला, मात्र एक जण मलब्याखाली दबला. आज दिवसभर त्या मजुराचा शोध घेण्यात आला, मात्र शोध लागला नाही.
बेकायदा बांधकाम अन् कोडगी मनपा
चिकलठाण्यातील हे बांधकामच बेकायदा असल्याचे आज समोर आले. २०१९-२० मध्ये ५५ चौरस मीटर म्हणजे केवळ एका खोलीच्या बांधकामाची परवानगी घेण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वी घेण्यात आलेली ही परवानगी आता कालबाह्य झाली आहे. मात्र कालबाह्य झालेल्या परवानगीवरच तब्बल चार हजार स्क्वेअर मीटरचे अवाढव्य बांधकाम करण्यात येत होते आणि हे बांधकाम होत असताना मनपाचा नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, वॉर्ड अधिकारी, इमारत निरीक्षक सगळे ढाराढूर झोपले होते. मनपाकडून घेण्यात येणारी बांधकाम परवानगी वर्षभरासाठीच वैध असते. मग या एवढ्या महाकाय बांधकामाला कोणाचे संरक्षण होते? त्याशिवाय एवढे बांधकाम करणे शक्यच नाही. बेकायदा बांधकाम रोखण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न करण्यात येत आहे.
अब्रूचे धिंडवडे निघाल्यावर मनपाला जाग
नाकासमोर बेकायदा बांधकाम चालू असतानाही मनपाला त्याची कानोकान खबर लागली नाही. मुजीदबा खान या व्यक्तीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी राठोड नावाच्या कंत्राटदाराला काम देण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर मनपाने मदतीसाठी धावाधाव केली. आयुक्त अमोल येडगे, महापौर समीर राजूरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. इमारतीचे बांधकाम बेकायदा आहे याचा डंका दिवसभर वाजत होता. परंतु ना आयुक्तांची, ना महापौरांची भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत झाली. लाजेकाजेस्तव आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगून हात वर केले. बांधकाम सुरू आहे त्याठिकाणी एक विहीर असून ती गाळाने भरलेली आहे. ही बुजवली का नाही, असा प्रश्नही आयुक्तांना पडला! शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाचा शोध घेऊन कारवाई करण्याचे शहाणपणही या घटनेनंतर मनपाला सुचले.
बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार
कालबाह्य झालेल्या बांधकाम परवानगीवर इमारतीचे काम सुरू असल्याचे समोर आले असून, हा प्रकार गंभीर आहे. बेकायदा प्लॉटिंगप्रमाणेच बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू करणार असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.
- कालबाह्य परवानगीवरच बेकायदा बांधकाम
- २४ तास उलटूनही बेपत्ता मजुराचा शोध नाही
- एसडीआरएफच्या पथकाला मदतीसाठी पाचारण
बेपत्ता मजुराच्या शोधासाठी एसडीआरएफला पाचारण
स्लॅब कोसळण्याच्या घटनेला २४ तास उलटून गेले तरी बेपत्ता असलेल्या मजुराचा शोध लागला नाही. मलबा उपसायचा कसा, स्लॅबसाठी वापरण्यात आलेले लोखंड कसे बाजूला काढायचे, असा प्रश्न बचाव पथकाला पडला. शेवटी पुण्याहून एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तीस जवानांचे हे पथक शुक्रवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. शनिवार सकाळपासून हे पथक शोधकार्य सुरू करणार आहे.
Comments are closed.