रोखठोक – कोतवाल दस्ता विरुद्ध फडणवीस दस्ता, कर्जतच्या जंगलाची लढाई!

कर्जतच्या साई जंगलात `टोरंट’ ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली आतापर्यंत अडीच हजारांवर झाडे निर्दयपणे कापली. 33 हजार झाडे एकूण तोडली जातील. हे सामुदायिक हत्याकांड म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांवर हल्ला आहे. जंगलातील क्रांतीचा इतिहास संपवण्याची ही योजना आहे. महाराष्ट्राचे सरकार हजारो झाडे तोडते व पुन्हा तोंड वर करून सांगते की, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्री खोऱ्यात गुजरातचे `मेहता अ‍ॅण्ड मेहता’ मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस या जंगलतोडीचे समर्थन करीत आहेत. हे दृश्य अस्वस्थ करणारे आहे. त्या सगळ्यांनी इतिहासात डोकावले पाहिजे. छत्रपती शिवराय व त्यांचे मावळे या अशाच जंगल आणि डोंगरकपाऱ्यात राहून मोगलांशी गनिमी काव्याने लढले व शिवरायांनी जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्यातील डेरेदार जंगले म्हणजे रणमैदान होती. आता त्यावर कुऱ्हाडी चालविण्याचे काम महाराष्ट्राच्या सरकारने चालवले आहे. सोमवारी दुपारी श्री. आदित्य ठाकरे यांच्या सोबत कर्जतमधील साई डोंगर परिसरातील जंगलात आम्ही पंप स्टोरेज प्रकल्प म्हणजे `टोरंट’ जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली करण्यात आलेली 2600 झाडांची कत्तल पाहिली. जालियनवाला बाग, पानिपत, गुजरातच्या दंगलीत माणसांचे मुडदे पडल्याप्रमाणे हजारो झाडे निपचित पडलेली दिसली. जणू त्यांनी तडफडून प्राण सोडला होता. त्यांच्यावर `टोरंट’ कंपनीने निर्दयपणे `कटर्स’ चालवले. त्या हजारो झाडांवरचे हजारो पोपट, कबुतरे, चिमण्या, मोर, साळुंख्या एका क्षणात निराधार झाल्या. आकाश त्या पाखरांच्या आकांताने, फडफडण्याने जणू रडू लागले. त्या डोंगरातील हल्ल्यात झाडांवरील हजारो घरटी पडली. पाखरांची अंडी व लहान पिले त्यात होती. प्राण्यांचा, पक्ष्यांचा हा सामुदायिक वध मुंबईतील `जैन’ समाजाला दिसू नये? कबुतरखान्यांसाठी लढणाऱ्या जैनांनी कर्जतच्या डोंगरावरील हजारो निर्वासित पाखरे आणि वन्यजीवांच्या मृत्यूवर विलाप करू नये हे एक धार्मिक ढोंग आहे. `मांसाहार’ हिंसा आहे, मग कर्जतच्या डोंगरांवरील प्राणीहत्या काय आहे? झाडांच्या कत्तली काय आहेत? जैनांनी मेहताच्या टोरंटविरुद्ध आवाज का उठवला नाही?

टोरंट कोणाचे?

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील जलविद्युत प्रकल्प गुजरातची `टोरंट’ कंपनी उभारीत आहे. त्यासाठी सरकारने कर्जतचा ऐतिहासिक साई डोंगर त्या कंपनीला आंदण दिला आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून साई डोंगर 16 किलोमीटर अंतरावर आहे. `टोरंट पावर’ ही गुजरातची एक खासगी कंपनी आहे. या कंपनीने भाजपच्या निवडणूक निधीत आतापर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याची नोंद आहे. या कंपनीला त्या बदल्यात साई डोंगर व शेकडो हेक्टर जमीन कवडीमोल भावात मिळणार आहे. पुन्हा महाराष्ट्राच्या पाण्यावर वीज बनवून ती हव्या त्या भावाने विकणार आहे. टोरंट कंपनीने या प्रकल्पासाठी 33 हजार झाडे तोडण्याची परवानगी मिळवली व त्यातील अडीच हजार झाडे तोडली. पाली तालुक्यातील लोकांचा विरोध डावलून कोणत्याही प्रकारची जनसुनावणी न घेता ही वृक्षतोड चालली आहे व जिल्ह्याच्या कलेक्टरने विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांना धमकावले आहे. टोरंट कंपनीने सर्व काही विकत घेतल्याचा हा पुरावा. टोरंट कंपनीची वृक्ष कत्तल सुरळीत पार पडावी यासाठी गृहमंत्री फडणवीस यांनी सशस्त्र पोलिसांची फौजच साई डोंगराच्या पायथ्याशी उभी केली. त्या सशस्त्र फौजेची भिंत तोडून श्री. आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही डोंगराकडे निघालो तेव्हा आमच्याबरोबर अख्खे गाव चालत होते आणि तोडलेली हजारो झाडे पाहून गाव अश्रू ढाळत होते. आदिवासींचे दोन पाडे येथे आहेत. त्यातला एक कातकरी पुढे येऊन म्हणाला, ”हे एक एक झाड दोनशे-अडीचशे वर्षांचे आहे. गावात आणि पंचक्रोशीत कोणाला साप, विंचू चावला आणि विष अंगात भिनले तर आम्ही डोंगरात येतो. विष उतरवणारी वनस्पती आम्हाला माहीत आहे. ती घेऊन खाली उतरतो व सर्पदंशावर उपचार करतो.” त्या सर्व औषधी वनस्पतींवर फडणवीस यांच्या कत्तलखान्याने `कटर्स’ चालवले. हे सर्व क्षेत्र घनदाट जंगल, पाणथळ आणि सह्याद्रीच्या इकोसिस्टिमचा भाग आहे. मध, डिंक, सरपण, नदीतले मासे, खेकडे येथे भरपूर आहेत. मुख्य म्हणजे शंभर टक्के प्राणवायू देणारे हे जंगल आहे. हे सर्व आता डोळ्यांसमोर नष्ट होत आहे!

बेबंद जंगलतोड

महाराष्ट्रात गोरेगावच्या `आरे’ जंगलापासून चंद्रपूरच्या व्याघ्र कारिडारपर्यंत सर्वत्र बेबंद जंगलतोड सुरू आहे. भाजपच्या लाडक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्र उघडाबोडका केला जात आहे. ऊर्जा-अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडणे, जंगले नष्ट करणे हा पर्याय नाही. कर्जतच्या वृक्षतोडीनंतर एका जागरूक महिलेने भावनिक उद्गार काढले, ”आम्ही लोडशेडिंग सहन करू, पण झाडे वाचवायला हवीत. नाहीतर पुढची पिढी प्राणवायूशिवाय गुदमरून मरेल.” कर्जतपाठोपाठ आता रत्नागिरीत `टोरंट पावर’ कंपनी येत आहे. 4,200 मेगावाटच्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी `टोरंट पावर’ आणि `जेएसडब्ल्यू एनर्जी’सोबत 79 हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साक्षीने हा करार झाला. या प्रकल्पातून हजारो रोजगार निर्माण होतील हे नेहमीचेच गाजर दाखवले जात आहे. `जेएसडब्ल्यू एनर्जीं’ने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भीव बंदर येथे 2,800 मेगावाट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. हे प्रकल्प शेती, पाणी, मासेमारी, सागरी जीवसृष्टी आणि हापूस आंब्याचा नाश करतील. हजारो हेक्टर जमीन त्या प्रकल्पांसाठी संपादित करावी लागेल. त्यामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा, कांदळवने नष्ट करावी लागतील. हजारो झाडांची कत्तल होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, हा सर्व निसर्ग `विनाश’ झाला तरी पर्यावरणावर काडीमात्र परिणाम होणार नाही.

श्री. आदित्य ठाकरे यांनी साई डोंगरावर जाताच फडणवीस यांनी टोरंट प्रकल्पाच्या बचावासाठी फौज उतरवली. जंगलतोडीचे समर्थन ही फौज करीत आहे. आश्चर्य असे की, दहशतवाद्यांविरुद्ध खटले लढणारे आड. उज्ज्वल निकम हे हजारो झाडांच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी उभे राहिले. हजारो झाडांच्या कत्तलीचा बचाव करणे हे कसाबचा बचाव करण्यासारखे आहे. फडणवीस यांनी दिलेला मजकूर श्री. निकम यांनी त्यांच्या `एक्स’ अकाऊंटवर प्रसिद्ध केला. तो हास्यास्पद आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही तोच मजकूर जसाच्या तसा प्रसिद्ध करून जंगलतोडीचे समर्थन केले. स्नेहा दुबे यांचे वडील विवेक पंडित हे आदिवासींच्या हक्कांसाठी लढे देणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे प्रमुख. आदिवासींच्या जंगलांवर कोणाचेही अपामण नको, ही त्यांची भूमिका. त्यांची कन्या मात्र भाजपची आमदार म्हणून आदिवासींच्या विरोधात जंगलतोडीचे समर्थन करण्यासाठी आटापिटा करत आहे. आड. निकम, स्नेहा दुबे वगैरेंनी जंगलतोडीचे केलेले समर्थन काय पातळीचे आहे ते खालच्या चौकटीत प्रसिद्ध केले आहे. 33 हजार झाडे तोडूनही हा `टोरंट पावर’ प्रकल्प पर्यावरणपूरक आहे असे सांगणाऱ्यांचे मेंदू कर्जतच्या डोंगरावर प्रदर्शनात मांडून ठेवायला हवेत.

कर्जतच्या साई डोंगराला क्रांतीचा इतिहास आहे. त्याला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. वीर भाई कोतवाल व त्यांचे सहकारी गोमाजी पाटील, हिराजी पाटील, भगत मास्तर हे 1942 च्या `चले जाव’ चळवळीत भूमिगत झाले. त्यांनी कर्जत तालुक्यात सशस्त्र फौज – `कोतवाल दस्ता’ स्थापन केला. त्यांनी याच जंगलात राहून ब्रिटिशांविरुद्ध समांतर सरकार चालवले. विजेच्या तारा तोडल्या. रेल्वे बंद पाडली. इंग्रजांवर हल्ले करून याच जंगलात आश्रय घेतला. इंग्रजांनी वीर कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी हॉल याच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केले. 2 जानेवारी 1943 रोजी याच जंगल परिसरात इंग्रजांबरोबर झालेल्या चकमकीत भाई कोतवाल, हिराजी पाटील यांना गोळ्या लागून हौतात्म्य प्राप्त झाले. साई डोंगर त्या क्रांतिकारकांच्या लढ्याचा साक्षीदार आहे. या जंगलात स्वातंत्र्यवीरांना आश्रय घेता आला. हा डोंगर, ही भूमी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानाशी जोडलेली आहे. आता 33 हजार झाडे कापून क्रांतिकारकांचे जंगल नष्ट करणे हे `पाप’ आहे, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नाही काय? की भारतीय  तीचे शत्रू म्हणून त्यांना बदनाम व्हायचे आहे?

कर्जतच्या जंगलात `कोतवाल दस्ता’ विरुद्ध `फडणवीस दस्ता’ असा नवा संघर्ष उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा लढा एका साई डोंगरापुरता मर्यादित नाही. आज एक साई डोंगर गेला, उद्या रायगड, सिंहगड, शिवनेरी, प्रतापगडावरही अशीच घुसखोरी होईल. कोतवाल दस्त्याच्या मागे महाराष्ट्राने उभे राहावे, अशी आर्त साद वीर कोतवाल व त्यांच्या क्रांतिकारी सहकाऱ्यांचे आत्मे घालीत आहेत. श्री. राज ठाकरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह साई डोंगरावर गेले. त्यांनी जंगलतोडीविरुद्ध सभा घेतली. काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळही गेले. राज्याच्या किमान दोन कोटी लोकांनी साई जंगलात पोहोचायलाच हवे!

जंगलतोडीचा हास्यास्पद बचाव; व्यक्ती दोन, मजकूर एकच

कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प

काय आहे वस्तुस्थिती?

– हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीजसुद्धा महाराष्ट्रातच!
– यातून 12 हजार मेगावॅट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30 हजार कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे.
– हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही, तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक.
– पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही.
– या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणासाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली.

– शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रीया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानग्या संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत.
– हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको सेन्सिटिव्ह झोन (SZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही.
– हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही.
– या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे.
– वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे.
– याच प्रकल्प क्षेत्रात टॉरंट कंपनी 60 हजार झाडे लावणार असून वन विभागाने 30 हजार झाडे, पाणी आणि जमीन वाचवली. वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कुलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि
– 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे.

ट्विटर – @rautsanjay61
Gmail – [email protected]

Comments are closed.