बहुमताचा अनादर करून गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव; संजय राऊत यांचा घणाघात

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक लोकशाही रक्षणासाठी स्वतःच सरकारमध्ये असूनही मोर्चे काढत आहेत. जर सरकारच लोकशाही रक्षणासाठी मोर्चे काढत असेल, तर महाराष्ट्रातील लोकशाही या सरकारमुळेच धोक्यात आहे, असा घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेली हुकूमशाही आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून न्यायालयीन लढा सुरू असून शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचार पॅनेलने गोकुळ दूध संघाच्या 25 पैकी 13 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. पाच-साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मतदान करून आपले प्रतिनिधी निवडून दिले आहेत. असे असतानाही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारखे लोकशाही विरोधी नेते बहुमताचा अनादर करत आहेत. नवीन कायदा आणून आणि तज्ज्ञ संचालक घुसवून स्वतः बहुमत सिद्ध करत गोकुळ संघ बळकावण्याचा सरकारचा लोकशाही विरोधी डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, देशात भाजपविरोधात जो रोष निर्माण झाला आहे, तो अशाच घटनांमुळे झाला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सहकारी संस्था बळकावण्यासाठीच अमित शाहांनी सहकार मंत्रालय स्वतःकडे ठेवले आहे. अमित शहा सहकार मंत्रालयाचे मुखिया आहेत. या सगळ्यांना मिळून ‘गोकुळ’ अमूलला विकायचे होते, मात्र शेतकऱ्यांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. देवेंद्र फडणवीस तुम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर मोर्चे काढता, मग आता गोकुळ वाचवण्यासाठी एक मोर्चा काढा, असे राऊत म्हणाले. गोकुळमध्ये बहुमत असतानाही अध्यादेशाच्या माध्यमातून चार जास्त संचालक लादणे आणि सत्ता गाजवणे यालाच लोकशाहीत षंढगिरी म्हणतात. लोकशाहीच्या नावावे ही षंढगिरी मुख्यमंत्री करत असतील तर महाराष्ट्राची जनता त्यांचा धिक्कार करेल. फक्त भाषण देता, संविधानाची आणि लोकशाहीची हत्या करता. हजारो शेतकऱ्यांच्या मतांचा अनादर करून अराजकता माजवण्याचे काम सरकार करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा हा डाव असून, शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला आहे. याचा सूड अशा पद्धतीने घेतला जात असेल, तर तुम्हाला या महाराष्ट्रात राज्य करणे कठीण जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा लोक तिरस्कार का करतात त्याचं आणखी एक उदारण म्हणजे गोकुळमध्ये सुरू असलेल्या घडामोडी. बहुमताचा अनादर करणं म्हणजे लोकशाहीची हत्या करणे हाच आहे, असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.

Comments are closed.