मणिपूर गोळीबारात ४ ठार

दोन नागा दहशतवादी गटांमध्ये संघर्ष

► वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरच्या नोनी जिह्यात दोन नागा दहशतवादी गटांमध्ये बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या संघर्षात चार जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली. या गोळीबारात झेलियानग्रोंग युनायटेड फ्रंट (झेनचुई) आणि नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम या संघटनांचे सदस्य सामील असल्याचा संशय आहे. ही घटना खौपुम भागातील ताओदाईजांग गावात घडली. या घटनेनंतर, महिलांसह अनेक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले. मात्र, तणावपूर्ण स्थिती कायम राहिल्यामुळे आणखी गोळीबार होण्याच्या भीतीने गावकरी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. दरम्यान, रोंगमेई नागा लुपुआम संघटनेने दोन्ही सशस्त्र गटांना लढाई थांबवून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सततच्या गोळीबारामुळे जनतेच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. सध्या, अधूनमधून होणाऱ्या गोळीबारादरम्यान गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

………

Comments are closed.