'मुरासू' आता आंध्रमधून तेलंगणाकडे जात आहे

आंध्र प्रदेशात 35 रेल्वेगाड्या रद्द : 12,000 लोक मदत शिबिरांमध्ये

वृत्तसंस्था/ हैदराबाद

मुरासू चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात प्रचंड पडझड घडवली आहे. या वादळात दोन जणांचा मृत्यू झाला असून 52,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. 35 पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता हे वादळ आंध्र प्रदेशमधून तेलंगणाच्या दिशेने पुढे सरकले आहे. या चक्रीवादळामुळे तेलंगणातही मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. खम्मम, नलगोंडा, सूर्यपेट, महबूबनगर, वानापर्थी आणि नागरकुर्नूल जिह्यांसाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आंध्रात या वादळामुळे राज्याचे अंदाजे 344 कोटींचे नुकसान झाले आहे. 12,230 लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. बुधवारीही आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू होता. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवार आणि मंगळवारी दक्षिण किनारपट्टी आणि रायलसीमा भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची सहा आणि एसडीआरएफची सात पथके अविरत सेवेत असल्याचे आंध्र प्रदेश आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रखर जैन यांनी सांगितले.

या वादळाच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेशात थंडी वाढली आहे. गेल्या 24 तासांत तापमानात सुमारे 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. बुधवारी सकाळी लखनौ, वाराणसी, मोरादाबाद, बिजनौर आणि हापूरसह 10 पेक्षा जास्त जिह्यांमध्ये धुक्याने वेढा घातला होता. पुढील 48 तासांत पूर्वांचल जिह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Comments are closed.