Pandharpur News – वसुबारस निमित्त विठ्ठल रूक्मिणी अलंकारांनी सजले
दीपावली महोत्सवास वसुबारसपासून प्रारंभ झाला आहे. या मंगलपर्वाच्या निमित्ताने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींना प्रथा-परंपरेनुसार आकर्षक पारंपरिक पोशाख व विविध मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत. दीपावलीच्या पहिल्याच दिवसापासून श्रींचे मनोहारी अलंकारिक रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
वसुबारस निमित्त श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, दंडपेट्या, मोठे हिऱ्याचे कंगनजोड, बालाजी नाम, मोत्याचा तुरा, तोडे जोड, तुळशीची माळ, शिरपेच, मोत्याची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्त्य जोड इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहे. तर श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाकीजोड, तोडे जोड, तारवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल सरी व कंबरपट्टा अशा पारंपरिक अलंकारा परिधान करण्यात आले आहे. पारंपरिक पोशाख आणि मौल्यवान अलंकारांमुळे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे रूप अधिकच लोभस व मनमोहक दिसत आहे.
दीपावली महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच भक्तनिवास व इतर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजन या दीपोत्सवातील विविध मंगलदिनी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे
Comments are closed.