संपाचे हत्यार उपसताच सरकार नमले; एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर, डीएमध्येही वाढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर राज्य सरकार नमले आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस मिळणार आहे. दिवाळी बोनससोबतच एसटीच्या पात्र कर्मचाऱ्यांना १२, ५०० रुपये सण उचल घेता येणार आहे. तसेच महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर ६० टक्के करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता. इंटक संघटनेने विविध मागण्यांसाठी संपाची घोषणा केली होती. दिवाळी बोनससह विविध आर्थिक मागण्या प्रलंबित असल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे; अन्यथा संपाच्या तयारीत असल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर अखेर राज्य सरकार जागे झाले आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक झाली. या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Comments are closed.