युरोपमध्ये खळबळ! बॉम्बच्या धमक्यांमुळे सुमारे 12 विमानांचे मार्ग बदलले, काहींचे इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युरोपमध्ये गुरुवारी (05 नोव्हेंबर 2026) हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. एका पाठोपाठ एक आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे सुमारे 12 विमानांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला. तसेच यातल्या काही विमानांचे तातडीनए इमर्जन्सी लँडिग करावं लागलं. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बची धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून युरोपमधील अनेक विमानतळांवर कसून सुरक्षा तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमकीनंतर डबलिनहून रोम चाललेली ‘एर लिंगस’ची फ्लाइट ‘EI402’ पॅरिसपासून 100 किलोमीटर दूर असलेल्या फ्रान्सच्या एव्हरेक्स विमानतळावर सुखरूप उतरवण्यात आली, तर हेलसिंकीहून रोम चाललेल्या फिनएअरच्या विमानाला इटलीच्या लढाऊ विमानांच्या संरक्षणात ‘रोम फिमिसिनो विमानतळावर’ उतरवण्यात आले. मात्र, इटली पोलिसांनी केलेल्या तपासणीत विमानामध्ये कोणतीही स्फोटके आढळली नाहीत. त्याचबरोबर रोमानियाच्या हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिलानहून बुखारेस्ट चाललेल्या विमानातील सुमारे 200 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली.

एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बचे अलर्ट मिळाल्यामुळे तपास यंत्रना अलर्ट मोडवर आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या धमक्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु युरोपीय अधिकारी या प्रकारांकडे रशिया आणि इराणशी जोडलेले ‘हायब्रिड अटॅक’ आणि तोडफोडीच्या कटाचा एक भाग म्हणून पाहत आहेत. अज्ञातांकडून याआधीही युरोपमधील अनेक सुपरमार्केटचे रेफ्रिजेशन सिस्टीम आणि फ्रान्सच्या ब्लड बँकांना लक्ष्य करण्यात आले होते. युरोपमधील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Comments are closed.