दिल्ली-एनसीआरमध्ये 'GRAP-3' लागू

राजधानीतील हवा बनली आणखी गंभीर : वायू प्रदूषण रोखण्यासाठी लादले अनेक निर्बंध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचल्याने, वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेअंतर्गत (ग्रॅप) तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजना लागू करण्याची घोषणा केली आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 401 ते 450 च्या दरम्यान पोहोचल्यानंतर ती ‘गंभीर’ श्रेणी मानून वायू प्रदूषण रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादले जातात.

‘ग्रॅप’च्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत, शासकीय, महानगरपालिका आणि खाजगी कार्यालयांमधील कामावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी असेल. उर्वरित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दैनंदिन हालचाल कमी करून प्रदूषणाची पातळी नियंत्रित करणे हा यामागील उद्देश आहे.

बांधकाम, उद्योगांना कडक नियम

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत अनेक अनावश्यक कामांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अनावश्यक बांधकाम आणि पाडकाम पूर्णपणे थांबवले जाईल. दगड फोडणे आणि खाणकाम या कामांवरही बंदी घालण्यात आली आहे. ही कामे वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण मानली जातात.

वाहनांवर कोणते निर्बंध?

दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये जुन्या वाहनांच्या वाहतुकीवर कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे. बीएस-थ्री पेट्रोल आणि बीएस-फोर डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी दिल्ली तसेच गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथे लागू असतील. तसेच जुन्या डिझेल मालवाहू वाहनांच्या दिल्लीतील प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

Comments are closed.