सईदच्या पत्नीचे दहशतवादी कनेक्शन?
महेश जेठमलानी यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या लोकप्रतिनिधीगृहांच्या निवडणुकांमध्ये वरिष्ठ लोकप्रतिनिधीगृह किंवा सिनेटमध्ये निवडून आलेले प्रथम मुस्लीम उमेदवार अब्दुल अल् सईद यांची चर्चा सध्या प्रसार माध्यमांमधून बरीच होत आहे. मात्र, यांच्या पत्नीसंबंधी वादग्रस्त माहितीही बाहेर येत आहे. त्यांच्या पत्नीचे कुटुंब मूळचे कर्नाटक राज्यातील भटकळ येथील आहे. या कुटुंबाचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप भारतातील प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.
जेठमलानी यांनी या संबंधात ज्या बाबी उघड केल्या आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष अमेरिकेतही खळबळ उडाली आहे, असे वृत्त आहे. सईद यांच्या पत्नीचे नाव डॉ. सारा जुकाकू असे आहे. त्यांचे माहेरचे कुटुंब मूळचे भारतातील भटकळ येथील आहे. भटकळ हे शहर इंडियन मुजाहिद्दिन या इस्लामी दहशतवादी संघटनेमुळे चर्चेत राहिलेले आहे. या दहशतवादी संघटनेचे म्होरके रियाझ भटकळ, इक्बाल भटकळ आणि यासीन भटकळ हे भारतात 2005 ते 2013 या काळात घडलेल्या अनेक बाँबस्फोटांचे सूत्रधार असल्याचा आरोप आहे. डॉ. सारा जुकाकू यांचे पिता तैय्यब जुकाकू हे इस्लामिक सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका या संघटनेच्या संस्थापक समितीचे सदस्य होते. ही संघटना आणि होली लँड फाऊंडेशन नामक आणखी एक संघटना यांच्यावर दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचे आरोप झालेले आहेत. या संघटनांचे संबंध इंडियन मुजाहिद्दिन या संघटनेशी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्वत: डॉ. अब्दुल अल् सईद यांचा संबंध मुस्लीम ब्रदरहूड या ईजिप्तमधील इस्लामी अतिरेकी संघटनेशी असल्याचेही आरोप आहेत.
सोशल मिडियावर माहिती
ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी अब्दुल अल् सईद आणि डॉ. सारा सईद यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीसंबंधी माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. ‘एक्स’ या संपर्क माध्यमावर त्यांनी या संबंधीची बरीच माहिती प्रसारित केली आहे. ही माहिती अनेकांसाठी नवी असल्याने तिची चर्चा होत आहे. अमेरिकेतही ही माहिती गोंधळ उडवून देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जेठमलानी यांच्या आरोपांमुळे सईद यांची अमेरिकेतील निवडणूक भारतातही गाजत आहे.
Comments are closed.