मुहूर्तावरच बाजार कोसळला!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मागील सात दिवसांपासून वधारणारा शेअर बाजार आज दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंगलाच कोसळला. ट्रेडिंगची सुरुवात सकारात्मक झाली खरी, पण ती क्षणिक ठरली. शेअर बाजारासाठी शुभसूचक मानल्या जाणाऱया मुहूर्तावर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो. मात्र यंदा विक्रीवर जोर राहिल्याने बाजार बंद होता होता निर्देशांकांनी लाल निशाण फडकवले. शेअर बाजार दुपारी 2.20 ते 3.30 वाजेपर्यंत बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुला होता. 2 वाजून 20 मिनिटांनी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वधारून खुले झाले, मात्र नंतर विक्रीचा दबाव वाढला. त्यामुळे सेन्सेक्स 28.62 अंकांनी घसरून 80,999.40 वर बंद झाला, तर निफ्टी 43.95 अंकांनी पडून 24,986.40 वर बंद झाला.

आठ वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं

मुहूर्ताच्या ट्रेडिंगला बाजार कोसळण्याची गेल्या आठ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2016 आणि 2017 मध्ये बाजार घसरला होता. त्यानंतर 2018 पासून 2025 पर्यंत प्रत्येक दिवाळी मुहूर्ताला सेन्सेक्स आणि निफ्टीने गुंतवणूकदारांच्या चेहऱयावर हास्य आणले होते. 2018 पासूनची ही परंपरा यंदा मोडीत निघाली. बीएसईवर महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंटरग्लोब एविएशन, ट्रेंट, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि ऑक्सिस बँकेला सर्वात मोठा फटका बसला.

सोने चकाकले! 60 हजार कोटींची विक्री

धनत्रयोदशीला सोने, चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. मागील वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोने-चांदीचे भाव बरेच कमी होते. ग्राहकांनी ही संधी साधली. सराफा व्यापाऱयांच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा धनत्रयोदशीला सोने व चांदीची सुमारे 66 हजार कोटी रुपयांची विक्री झाली. त्यापैकी 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल केवळ सोन्याची आहे.

वाहन विक्रीही जोरात

या वर्षी धनत्रयोदशीला वाहन विक्रीदेखील जोरात झाली आहे. देशभरात सुमारे 1 लाख वाहने विकली गेली आहेत. त्यातून अंदाजे 10 ते 12 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय घरगुती उपकरणांच्या विक्रीतही 10 ते 12 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

Comments are closed.