ट्रम्प समर्थकांनी पराभवाचा राग हिंदुस्थानींवर काढला! अमेरिकेतून चालते व्हा… दिवाळी कार्यक्रमात घोषणाबाजी
मध्यावधी निवडणुकांमध्ये झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा राग त्यांच्या समर्थकांनी आज अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिकांवर काढला. सिएटल येथे ट्रम्प समर्थकांचा एक गट दिवाळी कार्यक्रमात घुसला व त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. अमेरिकेतून चालते व्हा, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. या घटनेमुळे अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला. ट्रम्प यांनी अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहातील बहुमत गमावले. या पराभवामुळे ट्रम्प यांना धोरणात्मक निर्णय घेताना मनमानी करता येणार नाही. डेमोक्रॅट्सची संमती घ्यावी लागणार आहे. हा पराभव अति उजव्या विचारांच्या ट्रम्प समर्थकांच्या पचनी पडलेला नाही. अनिवासी हिंदुस्थानींनी मोठय़ा प्रमाणावर ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केल्याची चर्चा अमेरिकेत आहे. हाच राग ट्रम्प समर्थकांनी काढला.
टिळा, टिकलीवाले येथे नकोच!
सिएटल येथे काही लोक हिंदुस्थानी नागरिकांनी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात घुसले. हिंदू आणि हिंदुस्थानच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक त्यांच्या हातात होते. हिंदूंनो चालते व्हा अशा घोषणाही त्यांनी दिल्या. ‘ख्रिश्चनांची जागा हिंदूंना देऊ नका… टिळा आणि टिकलीवाल्यांचे पार्सल देशाबाहेर पाठवा… अशा घोषणाही त्यांनी दिल्या. आयोजकांनी या लोकांना रोखल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
एनआरआय उद्योजक, नेत्यांकडून तीव्र निषेध
सिएटलमध्ये घडलेल्या घटनेचा अमेरिकेतील खासदार प्रमिला जयपाल, उद्योजक अजय जैन भुतोरिया यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ‘हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. अशा प्रकारच्या वर्णभेदी आणि द्वेषपूर्ण घटनांना अमेरिकेत थारा नाही, असे जयपाल म्हणाल्या. तर, हा निव्वळ भेकडपणा आहे. हिंदू अमेरिकी नागरिकांना व स्थलांतरितांना अशा प्रकारे टार्गेट करणे, त्यांच्या विरोधात कारस्थाने करणे चालू देता कामा नये,’ असे भुतोरिया म्हणाले. कट्टरपंथीय दिवाळी कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालू शकतात. त्यामुळे हिंदू नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन ‘कोएलिशन ऑफ हिंदू ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संघटनेने केले आहे.
Comments are closed.