काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला

कुलगाममधील गोळीबारात तीन जवान जखमी : अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू

वृत्तसंस्था/ कुलगाम

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिह्यात बुधवारी दुपारी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. आता जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराकडून हल्लेखोरांना शोधण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिह्यातील अखरान कॅम्प येथील तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांवर बुधवारी दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना दुपारी 2:15 च्या सुमारास घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षा दल हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर लगेचच जखमी जवानांना उपचारासाठी अनंतनाग जिह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोटारसायकलवरून दहशतवादी हल्ला

दुपारच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गटावर अचानक गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहे. सुरक्षा दल परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात पाळत वाढवली आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

कुलगाममध्ये यापूर्वीही हल्ले

कुलगाम हा दक्षिण काश्मीरमधील एक संवेदनशील भाग असून येथे दहशतवादी कारवाया सर्वाधिक प्रमाणात होतात. हा भाग श्रीनगरपासून सुमारे 70-75 किलोमीटर अंतरावर आहे. काश्मीरमधील कुलगाम, अनंतनाग आणि शोपियान हे संवेदनशील भाग असून याठिकाणी यापूर्वीही दहशतवादी कारवाया झाल्या आहेत.

Comments are closed.