उद्यापासून सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा
सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होत आहे. ही विमानसेवा आठवडय़ाचे सातही दिवस उपलब्ध असेल.
‘फ्लाय 91’ ही विमान कंपनी या मार्गावर विमान चालवणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि मुंबई महानगर प्रदेशादरम्यान प्रवास करणाऱया नागरिकांना रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. या विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.
दोन्ही दिशांचा नियोजित प्रवास सुमारे 1 तास 10 मिनिटांचा आहे. सध्या या मार्गावर दररोज एक फेरी उपलब्ध असेल. त्यामुळे त्याच दिवशी मुंबईतून सिंधुदुर्गला जाऊन संध्याकाळी विमानाने परत येण्याची सुविधा या वेळापत्रकात नाही.
विमान उड्डाणांच्या वेळा
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग हे विमान सकाळी 7.55 वाजता उड्डाण घेईल, तर सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी चिपी येथे आगमन होईल. सिंधुदुर्ग ते नवी मुंबई हे विमान सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी प्रस्थान करेल, तर सकाळी 10.30च्या सुमारास नवी मुंबईत आगमन होईल.
चिपी विमानतळासाठी महत्त्वाचे पाऊल
चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी झाले होते. सुरुवातीला मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर अलायन्स एअरची सेवा सुरू झाली होती, मात्र ही सेवा ऑक्टोबर 2024 मध्ये बंद झाली. त्यानंतर विमानतळावरून पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांसाठी ‘फ्लाय 91’ सेवा चालवली जात आहे. आता नवी मुंबईशी थेट संपर्क सुरू झाल्यामुळे चिपी विमानतळाच्या नियमित वापराला चालना मिळण्याची शक्यता आहे.
पर्यटन, व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराला चालना
सिंधुदुर्ग जिल्हा समुद्रकिनारे, किल्ले, निसर्गरम्य पर्यटन स्थळे आणि कोकणी खाद्यसंस्पृतीसाठी ओळखला जातो. थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील पर्यटकांना जिह्यात पोहोचणे अधिक सोयीचे ठरणार आहे. हॉटेल व्यवसाय, स्थानिक वाहतूक, होम स्टे, पर्यटन मार्गदर्शक आणि स्थानिक खाद्य व्यवसायांना याचा फायदा होणार आहे. तसेच नोकरी, वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कामांसाठी मुंबईत येणाऱया सिंधुदुर्गवासीयांनाही या सेवेचा उपयोग होईल.
Comments are closed.