सरकारला 225 कोटींचा चुना; साताऱ्यात अदानीविरोधात पोलीस तक्रार दाखल, गावकऱ्यांच्या लढ्यात सयाजी शिंदेही उतरले
सातारा जिह्यातील तारळी प्रकल्पाच्या विरोधात गावकऱयांनी पुकारलेल्या लढय़ात आता अभिनेते सयाजी शिंदे उतरले आहेत. तारळी येथे जाऊन त्यांनी आज प्रकल्पास्थळाची पाहणी केली. प्रकल्पाची किंमत 99 टक्क्यांनी कमी करून सरकारला तब्बल 225 कोटींचा चुना लावणाऱया अदानी समूहा विरोधात त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. सह्याद्रीतील 23 प्रकल्प हद्दपार करेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
पाटण तालुक्यातील तारळी धरणावर अदानीच्या पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. सयाजी शिंदे, एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाचे नेते विवेकानंद पाटील तसेच पर्यावरणप्रेमींनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात झाडे तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अदानी समूह हा प्रकल्प उभारताना कोणत्याही नियमाचे पालन करत नसून आवश्यक परवानग्याही घेतल्या गेलेल्या नाहीत. सरकार आणि स्थानिक प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप सयाजी शिंदे यांनी यावेळी केला.
विनाशकारी प्रकल्पांविरुद्ध वज्रमूठ आवळा – विवेकानंद पाटील
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराजवळच हा प्रकल्प असल्याने येथील वन्यजीव धोक्यात आले आहेत. शासनाने सह्याद्रीतील सर्व 23 प्रकल्प पूर्णपणे मागे घ्यावेत. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा विवेकानंद पाटील यांनी दिला. गोरगरीब जनतेच्या घरांवर आणि पर्यावरणावर घाला घालणाऱ्या या धोरणाविरोधात नागरिकांनी कोणतीही फूट न पाडता एकजुटीने वज्रमूठ बांधली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
अशी केली फसवणूक
तारळी प्रकल्प 5 हजार 675 कोटींचा आहे. राज्य वन्यजीव संवर्धन निधीसाठी या प्रकल्पाची किंमत 56 कोटी 75 लाख रुपये इतकी दाखवून अदानी समूहाने सरकारची फसवणूक केली आहे. कायदेशीर परवानगी न घेताच प्रकल्पाचे 80 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केले आहे. यामुळे ‘सह्याद्री’तील जैवविविधतेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
Comments are closed.