गडचिरोलीत मायनिंग प्रकल्पांसाठी लाखो झाडांवर चालणार कुऱ्हाड! पाच कोटी झाडे लावणार… मुख्यमंत्र्यांनी आकड्यांचा ‘हवाबाण’ सोडला
राज्यभरात प्रकल्पांच्या नावावर होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीवरून महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. टोरंट प्रकल्पासाठी सरकारने कर्जत भीमाशंकर परिसरातील हिरव्यागार वनराईवर कुऱ्हाड चालवली. आता तोच प्रकार गडचिरोलीत होणार आहे. तिथे मायनिंगसाठी लाखो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर कार्यक्रमात काही झाडे तोडावी लागणार असे सांगत या वृक्षतोडीचे समर्थन केले. या झाडतोडीच्या बदल्यात पाच कोटी झाडे लावली जातील, असा ‘हवाबाण’ही त्यांनी सोडला.
मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱयावर होते. त्यांच्या उपस्थितीत लॉयड्स मेटल्सच्या ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप’ या उपक्रमाचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी फडणवीस यांनी खाणकाम आणि पर्यावरण संवर्धनाबाबत भूमिका मांडली. गडचिरोलीत मायनिंगच्या कामासाठी हजारो झाडे तोडली जात असताना मुख्यमंत्री, ‘थोडी झाडे कापावी लागली आहेत. आणखी थोडी कापावी लागतील’, असे म्हणाले. किती झाडे कापणार याचा नेमका आकडा मुख्यमंत्र्यांनी सांगितला नसला तरी कापल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात गडचिरोलीत पाच कोटी झाडे लावण्याचा संकल्प सरकारने केला. त्यावरून कापली जाणारी झाडेही त्याच प्रमाणात असतील असा अंदाज लावला जात आहे. या पाच कोटींपैकी एक कोटी झाडांची लागवड आतापर्यंत पूर्ण झाली असल्याचा दावाही त्यांनी केला, मात्र ही झाडे कुठे आणि कधी लावली, त्यांची सध्याची स्थिती काय आहे, हे सांगणे त्यांनी टाळले.
- एटापल्ली तालुक्यातील वेलमागड वनक्षेत्रात 623 हेक्टर जंगलात लोहखनिजाच्या शोधासाठी आणि भूगर्भीय छिद्रणासाठी राज्य सरकारने ओम साईराम कंपनीला नोव्हेंबर 2026 मध्ये परवानगी दिली आहे. खनिजांचे साठे आढळल्यास या भागात मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होईल.
- सुरजागड लोहखाणीच्या उत्खनन क्षमतेच्या वाढीसाठी 937 हेक्टर वन जमीन खाणकामासाठी वळवण्यास केंद्र व राज्य पातळीवर मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे 1 लाख 24 हजार लहान-मोठ्या झाडांची कत्तल होणार आहे.
- सुरजागड भागात सध्या लॉयड्स मेटल अॅण्ड एनर्जी लिमिटेड ही कंपनी उत्खनन करत आहे. या कंपनीला 2007 मध्ये खाणपट्टा मिळाला होता, मात्र नक्षलवादामुळे कंपनीला उत्खनन करता आले नव्हते. 2021 पासून प्रत्यक्ष उत्खनन सुरू झाले.
- अहेरी तालुक्यातील देवलमरी-काटेपल्ली येथे 537.54 हेक्टर क्षेत्रात चुनखडी उत्खननाचे नियोजन असून या प्रकल्पासाठी अंबुजा कंपनीची निवड करण्यात आली आहे. या क्षेत्रातील वन, खासगी आणि महसूल जमीनही प्रकल्पात जाणार आहे.
सुरजागडमध्ये पाच कंपन्यांना मंजुरी
सुरजागड टेकडीवरील विस्तारित खाणकामासाठी पाच कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 1,526 हेक्टर क्षेत्राच्या खाणपट्टय़ासाठी नॅचरल रिसोर्सेस एनर्जी प्रा. लिमिटेड, 886 हेक्टरसाठी युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इक्विपमेंट अॅण्ड टेक्निकल सर्व्हिसेस, 640 हेक्टरसाठी ओमसाईराम स्टील्स अॅण्ड अलॉयज, 397 हेक्टरसाठी जेएसडब्ल्यू स्टील आणि 658 हेक्टरसाठी सनफ्लॅग आयर्न अॅण्ड स्टील पंपनीचा समावेश आहे. या पाचही खाणपट्टय़ांचे एकत्रित क्षेत्र 4 हजार 107 हेक्टर आहे.
स्थानिक आदिवासींचे आंदोलन भडकणार
आधीच गडचिरोलीच्या सुरजागड आणि एटापल्ली परिसरात मायनिंगसाठी मोठय़ा प्रमाणात झाडे कापली गेली. भूसंपादनही मोठय़ा प्रमाणात केले गेले. त्याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. आता फडणवीस यांच्या नव्या विधानामुळे ही आंदोलने आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.