शिवतीर्थावर शिवतेजाचा जागर; शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिन, निष्ठेच्या वारीसाठी शक्तिस्थळ सज्ज

दूरदर्शी नेतृत्व, उत्तुंग कर्तृत्व आणि अमोघ वक्तृत्वाद्वारे राजकारण व समाजकारणात युग निर्माण करणारे हिंदुस्थानचे महानेते, शिवसैनिकांचे पंचप्राण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी 14 वा स्मृतिदिन. यानिमित्ताने आपल्या लाडक्या साहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांची पावले मुंबईची वाट चालू लागली आहेत. शिवतीर्थावर उद्या शिवतेजाचा जागर होणार आहे. निष्ठेच्या या वारीसाठी शक्तिस्थळ सज्ज झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचे दैवत. ‘शिवसेना’ हा चार अक्षरी मंत्र देऊन बाळासाहेबांनी कोटय़वधी लोकांना प्रेरणा दिली. मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्रधर्म जागवतानाच राष्ट्रविरोधी शक्तींनाही ललकारले. बाळासाहेबांचे विचार प्रमाण मानून आजही लाखो शिवसैनिक राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. बाळासाहेबांचा स्मृतिदिन हा या सर्वांसाठी श्रद्धा आणि निष्ठेचा जागर करण्याचा दिवस. साहेबांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याचा दिवस. त्यासाठी शिवसैनिक मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.

फुलांची आकर्षक सजावट

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शक्तिस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या सोनचाफ्याच्या फुलांचाही वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. शक्तिस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर भगवे ध्वज लावण्यात आले असून संपूर्ण वातावरण भगवेमय झाले आहे.

शिवसेना नेत्यांनी केली पाहणी

शक्तिस्थळावरील तयारीची शिवसेना नेत्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. अभिवादनासाठी येण्याचा व बाहेर पडण्याच्या मार्गाचे नियोजन काय आहे याची माहिती घेण्यात आली. गर्दी होऊ नये या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, सचिव साईनाथ दुर्गे, प्रवीण महाले, मुंबई महापालिकेच्या उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

दर्शन आणि वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांच्या सूचना

शक्तिस्थळावर येणाऱ्या शिवसैनिकांना विनाअडथळा दर्शन घेता यावे म्हणून मुंबई पोलिसांकडून वाहतूक व दर्शन व्यवस्थेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

वाहने उभी करण्यास परवानगी असलेले रस्ते

संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहीम ते दादर

पाच उद्यान (फाईव्ह गार्डनस्) परिसर माटुंगा

लखमशी नप्पू रोड (हिंदू कॉलनी) माटुंगा

मोठय़ा वाहनांसाठी सूचना

पश्चिम व उत्तर उपनगरातून मोठय़ा वाहनांतून येणाऱ्या (उदा. बसेस, टेम्पो इत्यादी) कार्यकर्त्यांनी माहीम जंक्शन येथे डावे वळण घेऊन मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावरून बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत येऊन वाहने पार्क करून स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जावे. जीप अथवा कार एल. जे. रोडने राजा बढे चौकापर्यंत न्यावीत व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने सेनापती बापट रोडवर
पार्किंगसाठी पाठवावीत.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस) सायन जंक्शन येथून उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने ‘वाय’ जंक्शन ‘टी’ जंक्शन मार्गे धारावी, कलानगर, माहीम कॉजवे, माहीम जंक्शन डावे वळण मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावर जातील. वाहनातील कार्यकर्ते उतरल्यानंतर वाहने सेनापती बापट मार्गावर पार्क करावीत. आवश्यकतेनुसार पोलीस अधिकारी व अंमलदार सदर वाहने डॉ. बी. ए. रोडने दादर टी.टी. पर्यंत जाऊ देतील व तेथे वाहनांतील कार्यकर्ते उतरल्यानंतर सदरची वाहने रुईया जंक्शन मार्गे पाच उद्यान पार्क परिसरात पार्क करतील. जीप व कार ही वाहने डॉ. बी. ए. रोडने रुईया जंक्शनपर्यंत नेऊन त्यातील कार्यकर्ते उतरल्यानंतर रुईया जंक्शन येथून उजवे वळण घेऊन लखमशी नप्पू रोड (हिंदू कॉलनी) येथे पार्किंगसाठी जातील.

दक्षिण मुंबईहून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस) डॉ. ऍनी बेझंट मार्गे काशीनाथ घाणेकर जंक्शनपर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्किंग करती

दक्षिण मुंबईहून डॉ. बी. ए. रोड मार्गाने येणारी वाहने दादर टी.टी.पर्यंत येतील व तेथे त्या वाहनातून कार्यकर्ते उतरल्यानंतर ती पाच उद्यान पार्क माटुंगा येथे पार्किंग करतील.

पाच ठिकाणी पाणपोईची व्यवस्था

महापालिकेच्या वतीने 5 ठिकाणी पाणपोईची व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात शौचालये उभी करण्यात आली असून कबड्डी असोसिएशनच्या शेजारी तात्पुरत्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन) n राजा बढे चौक जंक्शन ते केळुसकर मार्ग उत्तर जंक्शन येथेपर्यंत n दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी n गडकरी चौक येथून केळुसकर रोड दक्षिण व उत्तर n दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत n बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापटपासून पश्चिम दिशेला लेडी जमशेटजी मार्गापर्यंत

वाहने उभी करण्यास प्रतिबंध

एस. व्ही. एस. रोड, (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन) n केळुसकर रोड (दक्षिण) आणि केळुसकर (उत्तर), दादर

एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड ते एल जे रोड) दादर n पांडुरंग नाईक मार्ग, (रोड नं.5 जंक्शन ते एल.जे. रोड) दादर, दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर  n दिलीप गुप्ते मार्ग, (छत्रपती शिवाजी महाराज पार्क गेट क्र.4 ते शितलादेवी रोड) दादर n एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक) दादर

दर्शन रांगेची व्यवस्था अशी असेल!

शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, जिल्हासंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष व मान्यवर व्यक्तींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील संयुक्त महाराष्ट्र दालना समोरील शिवपुतळ्याच्या शेजारील प्रवेशद्वारातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवसैनिकांसाठी व इतर सर्वांसाठी समर्थ व्यायाम मंदिराकडून दर्शन रांगेतून प्रवेश दिला जाईल.

दर्शन रांगेतून येऊन स्मृती चौथऱ्यावर पुष्पांजली वाहण्याची व्यवस्था केली आहे. त्याप्रमाणे सहकार्य करावे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी करण्यास परवानगी नाही याची कृपया नोंद घ्यावी.

सकाळी 7 वाजल्यापासून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन करता येणार आहे. दिवसभरात हजारो शिवसैनिक शक्तिस्थळावर साहेबांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होतील. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींचा ओघ अखंड राहणार असल्याने त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Comments are closed.