AI चा सल्ला देखील
आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आता अनेकजण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान साधनांचा किंवा एआयचा सल्ला घेत आहेत, असे दिसून येत आहे. तज्ञांकडे जाऊन असा सल्ला घेण्यापेक्षा एआय अनेकांना अधिक सोयीस्कर वाटत आहे. गुजरात राज्यातील बडोदा येथील एका दांपत्याने त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अशा प्रकारे एआयचा सल्ला घेतल्याच्या घटनेची सध्या चर्चा होत आहे. जवळपास दोन महिने या दांपत्यातील पतीने एआयचा विविध प्रकारे सल्ला घेऊन पाहिला. एआय साधनाने पतीला पत्नीपासून घटस्फोट घेण्याची सूचना केली. त्यामुळे पत्नीला प्रचंड संताप आला.
पतीने मात्र, एआयच्या सल्ल्यानुसार पत्नीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. त्याने घटफोटासाठी आवेदनपत्र सादर केले. त्यामुळे पत्नीला प्रचंड संताप आला आणि तिने या प्रकारची तक्रार महिला हेल्पलाईवर सादर केली आहे. त्यानंतर या महिला हेल्पलाईनचे तज्ञ त्यांच्या घरी आले. त्यांनी दोघांनाही एकत्र बसवून त्यांचे समुपदेशन केले. घरगुती किंवा पती-पत्नींच्यामधील समस्या एआयच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणे किती अयोग्य आहे, या संबंधी या तज्ञांनी त्या दोघांनाही माहिती देण्याचा प्रयत्न केला. अशा समस्या एआयच्या माध्यमातून नव्हे, तर परस्परांमध्ये चर्चा करुन सोडविल्यास ते अधिक योग्य ठरते, हे समजून देण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान हे अनेक क्षेत्रांमध्ये उपयुक्त असले, तरी सर्वत्र त्याचा उपयोग करण्याची सवय लावून घेणे घातक ठरु शकते. कारण प्रत्येक वेळी एआय उचित सल्ला देईलच याची कोणतीही शाश्वती नाही. एआयकडूनही गंभीर चुका होऊ शकतात. परिस्थितीचे अचूक आकलन करण्याची एआयची क्षमता वादग्रस्त आहे. एआयमध्ये जी माहिती आधीपासून ‘फीड’ केलेली असते, त्याच माहितीचे विश्लेषण करुन एआयचे साधन आपल्याला सल्ला देते. त्याच्यात फीड करण्यात आलेली माहिती अपुरी किंवा मर्यादित असू शकते. तसेच नेमका कोणता उपाय कोणत्या समस्येवर आणि कोणाला उपयोगी पडू शकतो, हे गणिती सूत्रांच्या पद्धतीने निर्धारीत करता येतेच असे नाही. त्यामुळे सावधता आवश्यक आहे, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.
Comments are closed.