मराठी माणसाला मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, अभ्युदय नगरवासीयांच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांची ठाम भूमिका
मुंबईत मराठी माणसाचा टक्का टिकवायचा असेल तर गिरणी कामगार, पोलीस, महापालिका, मंत्रालय, अग्निशमन दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱयांना मुंबईतच महापालिकेच्या जागेवर हक्काची घरे मिळाली पाहिजेत, अशी ठाम भूमिका शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडली.
गेल्या अनेक वर्षांपासून अभ्युदय नगरमधील हजारो मराठी कुटुंबे आपल्या हक्काच्या, सुरक्षित आणि प्रशस्त घराच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र महायुती सरकार आणि म्हाडाच्या धोरणांमुळे व तांत्रिक अडथळय़ांमुळे हा पुनर्विकास प्रकल्प वारंवार लांबणीवर पडत आहे. या पार्श्वभूमीवर ‘अभ्युदय नगर नागरिक रहिवासी सेवा संघाच्या’ वतीने सोमवारी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले, मुंबईतील मोक्याच्या जागा सरकार अदानीला फुकटात देऊ शकते तर अभ्युदय नगरवासीयांना त्यांच्या मागणीनुसार 740 चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या सभेला शिवसेना आमदार अजय चौधरी, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, नगरसेवक सुप्रिया दळवी, दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, विजयदत्त झांझुरे यांच्यासह अभ्युदय नगर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अभ्युदय नगर नागरिक रहिवासी सेवा संघाचे समन्वयक विजय वारंग, जयसिंग भोसले, महेश वाडकर, दिलीप बने, हेमंत पांचाळ, प्रकाश पवार यांच्यासह रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा धसका
रहिवाशांच्या सोमवारी होणाऱया जाहीर सभेला आदित्य ठाकरे संबोधित करणार असल्याचे समजताच म्हाडाने त्याचा धसका घेत सभेच्या दिवशीच म्हणजे सोमवारी रहिवाशांची तातडीने बैठक बोलावली. विशेष म्हणजे रविवारी रात्री उशिरा रहिवाशांना व्हॉट्अॅपवरून मीटिंगबाबत म्हाडाने कळवले.
Comments are closed.