देवाला आपल्या भक्ताच्या उद्धाराची तीव्र, मनापासून इच्छा असते.

अध्याय नववा

अखंड कीर्तने माझ्या यत्न-शील दृढ-व्रती। भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ।। 14 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार भगवंतांचे भजन करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे कीर्तनभक्ती. ती करणारे स्वत: आत्मरूप होऊन, इतरांचाही उद्धार व्हावा म्हणून कीर्तनाचे महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आणून देतात. त्याप्रमाणे जे भजन करतात त्यांनाही मुक्ती प्राप्त होते. भगवंत पुढे म्हणतात, माझा नामघोष करणारे भक्त, माझे अत्यंत आवडते असतात. त्यामुळे मी त्यांना सोडून राहू शकत नाही. अष्टांगयोगाच्या मार्गाने काही साधक माझे भजन करतात. कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या माझ्या नामांचेच कथन करत असताना मध्ये मध्ये आत्मचर्चा करत ते चराचरामध्ये योगाभ्यासाच्या माध्यमातून संचार करतात.

कित्येक भक्त मला दुसऱ्या प्रकाराने भजत असतात. तो असा. वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे येथून तेथून एकच सूत असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्यावाचून अन्य काही आहे असे ते समजतच नाहीत. ब्रह्मदेवापासून आरंभ करून चिलटापर्यंत जे काही आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून, मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता, जो पदार्थ नजरेपुढे येईल त्यास मीच समजून सरळ लोटांगण घालतात. समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेच त्यांना आवडते. उंच जागेवरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप येऊ लागते त्याचप्रमाणे पाहिलेल्या प्रत्येकाला नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते माझा जयजयकार करून मलाच अर्पण करतात. सर्वांना नमस्कार करत असताना त्यांचा मान व अभिमान नाहीसा झाल्याने ते सहजगत्या मद्रूप होतात. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठप्रतीची भक्ति सांगितली. अर्जुना भक्तीचा हाही प्रकार सहजसाध्य नाही, त्यासाठी श्रेष्ठ धारिष्ट्या व माझ्यावर अढळ श्रद्धा लागते.ह्या श्रेष्ठ प्रतीच्या भक्तीबद्दल अधिक सांगताना एकनाथी भागवतात नाथमहाराज म्हणतात, भगवंतांच्या सांगण्यानुसार जर एखाद्याने ठरवले की, समोर येईल त्याला नमस्कार करायचा तर त्याला ते सहजी शक्य होणार नाही कारण एखाद्याला आपणहून मान द्यावा असे माणसाला चटकन वाटत नाही. हा असा कोण लागून गेला की, मी ह्याला नमस्कार करावा असा विचार त्याच्या मनात येतो. दुसरे म्हणजे ज्या ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांना तो नमस्कार करू लागतो ते ह्याला आज काय झाले आहे? हा वेड्यासारखे का करू लागला आहे? असे म्हणतात आणि बहुधा हा वेडा झाला आहे अशा निष्कर्षाला येतात. ह्यावर उपाय म्हणून नाथमहाराज सांगतात, अशाप्रकारच्या भजनाची ज्याला सुरवात करावी असे वाटेल त्याने त्याला जिथे कुणीही त्याला ओळखत नाहीत तिथे जाऊन असे भजन सुरु करावे.

अनुक्रमे

Comments are closed.