SIR ची मुदत वाढवणे
महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये अंतिम मतदारयाद्या आता 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरावलोकनासंदर्भात (एसआयआर-2026) एक मोठा बदल केला आहे. महाराष्ट्र, झारखंडसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अंतिम मतदारयाद्या आता 30 नोव्हेंबरऐवजी 22 डिसेंबर, 2026 रोजी प्रसिद्ध केल्या जातील, अशी घोषणा बुधवारी केली. आयोगाने ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. अनुपस्थित, स्थानांतरित, मृत आणि दुबार प्रवर्गातील मतदारांची ओळख आणि पडताळणी सुरळीतपणे व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाचे सुधारित वेळापत्रक झारखंड, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड आणि हरियाणा या राज्यांना लागू होईल. आयोगाने या सर्व राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 22 डिसेंबर निश्चित केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सुधारित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) हे अर्ज घरोघरी जाऊन वितरित करतील आणि परत गोळा करतील. सादर केलेल्या अर्जांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. मतदारयादीत आढळलेल्या कोणत्याही त्रुटी दूर करून, अंतिम यादी 22 डिसेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. साहजिकच मतदारांना आता सुधारित तारखेनुसार अंतिम यादीसाठी प्रतीक्षा करावी लागेल.
Comments are closed.