बिहारमध्ये एका चित्रपटातून 40 कोटींची चोरी

दिवसाढवळ्या आठ सशस्त्र गुन्हेगारांचा धुमाकूळ : ‘सेन्को ज्वेलर्स’मधून दागिन्यांची लूट

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमधील पश्चिम चंपारण जिह्यातील बेतिया येथे सशस्त्र गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या मोठा दरोडा टाकल्यामुळे राज्यात घबराट पसरली आहे. दुचाकीवरून आलेल्या सुमारे आठ गुन्हेगारांनी कालीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रिया सिनेमा रोडवरील ‘सेन्को ज्वेलर्स’ शोरूम लुटले. प्राथमिक माहितीनुसार, गुन्हेगार अंदाजे 30 ते 40 कोटी रुपयांचे दागिने घेऊन फरार झाले आहेत. शहराच्या मध्यभागी दिवसाढवळ्या एवढा मोठा दरोडा टाकून गुन्हेगारांचे पलायन, पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते. दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पथके नियुक्त करून शोध सुरू केला आहे. डीआयजी, एसपी आणि डीएसपी यांच्यासह अनेक पोलीस ठाण्यांतील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ज्वेलर्समध्ये दरोडा पडल्याची घटना उघड झाल्यानंतर पोलीस दल हादरले आहे. डीआयजी हरकिशोर राय, एसपी कुमार गौतम आणि डीएसपी अजित कुमार यांच्यासह अनेक पोलीस ठाण्यांतील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि शोरूममधील कर्मचारी व प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. पोलीस जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज आणि घटनेच्या इतर पैलूंचा तपास करत आहेत. दरोड्याच्या घटनेदरम्यान गुन्हेगारांनी कर्मचारी आणि इतर लोकांना ओलीस ठेवत त्यांचे हात बांधून आणि मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचेही समोर आले आहे. या सशस्त्र दरोड्यादरम्यान काही कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सुमारे आठ शस्त्रधारी दरोडेखोर तीन बाईक्सवरून ज्वेलर्समध्ये दाखल झाले होते. दागिन्यांच्या शोरुममध्ये प्रवेश करताच त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांना बंदुकीच्या धाकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांचे हात बांधले आणि त्यांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले. कोणीही प्रतिकार करू नये किंवा पोलिसांना किंवा इतर कोणालाही माहिती देऊ नये म्हणून गुन्हेगारांनी सर्वांना एकाच जागी बसवले.

निर्भयपणे कोट्यावधींच्या दागिन्यांची लूट

लोकांना ओलीस ठेवल्यानंतर गुन्हेगारांनी शोरूममध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने गोळा करण्यास सुरुवात केली. दुकानात उपस्थित असलेल्या महिलांच्या म्हणण्यानुसार, सर्व गुन्हेगार शस्त्रधारी होते. प्रतिकार केल्याबद्दल किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा आणल्याबद्दल दोघांच्या डोक्यात मारहाण करण्यात आल्याचेही वृत्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार, गुन्हेगारांनी अंदाजे 30 ते 40 कोटी रुपयांचे दागिने लुटले आहेत. शोरूमच्या नुकसानीचा अंदाज रात्री उशिरापर्यंत घेतला जात होता.

पुन्हा दरोडा टाकण्याचीही धमकी

या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी जाताना आपण दरोडा टाकण्यासाठी पुन्हा येणार असल्याची धमकी दिली आहे. शोरूममध्ये उपस्थित असलेल्या एका महिला प्रत्यक्षदर्शीनुसार, दरोडा टाकून बाहेर पडताना गुन्हेगारांनी ‘आम्ही पुन्हा येऊ, हा एक पिक्चर आहे.’ असे म्हटल्याचे सांगितले. गुन्हेगारांच्या या कथित धमकीमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच खळबळजनक बनले आहे.

बेतियामधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दिवसाढवळ्या झालेल्या या मोठ्या दरोड्यामुळे संपूर्ण बेतियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला, बेतियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी एक म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. आता गुन्हेगारांना ओळखण्याचे आणि अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Comments are closed.