जे काम कश्मीरात अतिरेक्यांनी केलं तेच सरकार देशात करतंय का? ‘एसआयआर’वरून उद्धव ठाकरे यांचा सणसणीत सवाल
कश्मीरमध्ये हिंदुस्थानी नागरिकांनाच मतदानाचा हक्क नाकारण्याचे काम अतिरेक्यांनी केले होते, तेच काम आता एसआयआरच्या माध्यमातून केंद्रातील भाजपचे सरकार देशात करतेय का, असा सणसणीत सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तोफ डागली.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. वैदेही तामण यांच्या ‘लल देद: काश्मीरची आई’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघात झाले. कश्मीरमधील संत लल देद यांच्या जीवनावर आधारित या पुस्तकात तेथील दहशतग्रस्त परिस्थितीही मांडली गेली आहे. कश्मीरमधील त्या परिस्थितीची तुलना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विद्यमान राजवटीशी केली. कश्मीरमधील हिंदू, मुस्लिम समाज सांधण्याचा प्रयत्न लल देदने केला तोच कश्मीर भाजप राजवटीने तोडून टाकला. श्रीनगरमध्ये, जम्मूमध्ये हिंदूंना स्वतंत्र वस्त्या स्थापाव्या लागल्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
1979 मध्ये कश्मीरमध्ये आपण अभ्यास दौरा केला होता. त्यावेळी तेथील नागरिक तुम्ही हिंदुस्थानचे आहात का असे विचारायचे. त्याबद्दल विचारणा केल्यास, आमच्यासाठी हिंदुस्थानी सरकारने काय केलेय? कश्मीर म्हणजे पृथ्वीवरचे नंदनवन वगैरे ठीक आहे, पण रोजीरोटीचे काय? इथला पर्यटनाचा सर्व पैसा हिंदुस्थान सरकार घेऊन जाते, आम्हाला काय मिळते? असे कश्मिरी नागरिक म्हणायचे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कश्मीरच्या अनेक घरांमध्ये बाळासाहेबांची पूजा होते
कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हिंदू पंडितांच्या हत्या केल्या होत्या. अतिरेक्यांनी राखणदारासह घरातील पुरुषांना गोळ्या घातल्या आणि महिलांना घराबाहेर हाकलून घर ताब्यात घेतले होते अशी व्यथा एका पंडिताने त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी बाळासाहेब हिंदू पंडितांच्या रक्षणासाठी धावून गेले होते. कुपवाडासह कश्मीरच्या अनेक घरांमध्ये बाळासाहेबांची केवळ प्रतिमा नाही तर पूजा होते, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
Comments are closed.