हिंदुस्थान आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर! राहुल गांधी यांनी अमेरिकेतून मांडले भीषण वास्तव
‘वाढती बेरोजगारी, घटलेले उत्पादन आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांमुळे हिंदुस्थान आर्थिक विध्वंसाच्या उंबरठय़ावर उभा आहे. वेळ निघून जात आहे. आणखी पाच ते दहा वर्षे अशाच पद्धतीने कारभार सुरू राहिल्यास देश खरोखरच मोठय़ा आर्थिक संकटात सापडेल,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिला.
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षकांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी जागतिक आर्थिक परिस्थितीवर बोलताना त्यांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. मोदी सरकारच्या अर्थनीतीवर जोरदार हल्ला चढवला. ‘हिंदुस्थानची आर्थिक प्रगती दशकभरापासून थांबली आहे. लघु, मध्यम उद्योग आणि शेती हा हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रोजगार निर्मितीसाठी ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत. हा कणाच मोडून पडला आहे. या क्षेत्रांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या सगळ्या योजना अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत. हिंदुस्थान आर्थिक आपत्तीच्या उंबरठय़ावर आहे. याकडे भलेही मीडिया किंवा इतर कोणी दुर्लक्ष करत असेल; पण हेच वास्तव आहे, असे राहुल यांनी ठासून सांगितले.
…तरीही मी आशावादी
अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनसारख्या देशांमधील वाढती बेरोजगारी व आर्थिक समस्या बघता हिंदुस्थानबद्दल मी खूप आशावादी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ‘आमचा खर्च खूप कमी आहे. आमच्याकडे लोक आहेत. दुःख आणि वेदना सहन करण्याची आमची शक्ती जास्त आहे. त्यामुळे मी भारताबद्दल खूप आशावादी आहे,’ असे ते म्हणाले.
टाटा कंपनी अक्षरशः ताब्यात घेण्यापर्यंत…
हिंदुस्थानात फक्त गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हेच का प्रगती करत आहेत? इतर खासगी गुंतवणूक का होत नाही? टाटा कंपनी अक्षरशः ताब्यात घेण्यापर्यंत अदानीची मजल का गेली आहे? – राहुल गांधी
Comments are closed.