कॅनडात जळत्या कारमध्ये हिंदुस्थानी तरुणाचा मृतदेह आढळला; ‘टार्गेटेड किलिंग’चा पोलिसांना संशय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील लँगली परिसरात एका जळत्या कारमध्ये २५ वर्षीय हिंदुस्थानी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. तुषार शर्मा असे या तरुणाचे नाव असून, हा प्रकार नियोजित हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कॅनडाच्या तपास यंत्रणांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.

तुषार शर्मा हा सरे येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास लँगलीमधील रॉलिन्सन क्रेसेंट परिसरात एका कारला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच लँगली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बचाव पथकाला कारच्या आत मानवी अवशेष आढळून आले. तपासानंतर हा मृतदेह तुषार शर्मा याचा असल्याची ओळख पटली.

विशेष पथकाकडून तपास सुरू

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कॅनडाच्या ‘इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम’ने या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांना लँगली आरसीएमपी (RCMP), फॉरेन्सिक पथके आणि बीसी कोरोनर्स सर्व्हिसकडून मदत केली जात आहे. तुषारच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय आणि घटनेपूर्वी नेमका काय घटनाक्रम घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, मृत्यूपूर्वी तो कोणाच्या संपर्कात होता आणि कुठे गेला होता, याचाही शोध घेतला जात आहे.

Comments are closed.