भाईंदरचा लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, महिलेकडून २५ हजार घेताना अटक
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी रिअल इस्टेट एजंट महिलेकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना काशिमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. बांगलादेशी महिलेला फ्लॅट भाड्याने दिल्याप्रकरणी खाडे याने या महिलेवर प्रचंड दबाव आणला होता. पैसे दिले नाहीत तर या गुन्ह्यात आरोपी करण्याची धमकीही त्याने या महिलेला दिली होती.
रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या स्वाती पाटील या रिअल इस्टेट एजंट वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्य आहेत. त्यांनी एका महिलेला भाडेतत्त्वावर फ्लॅट दिला होता. त्यासाठी रीतसर भाडेकरार करण्यात आला होता. तसेच संबंधित महिलेबाबत पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) घेण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनंतर काशिमीरा पोलिसांनी या महिलेला अटक केली. पोलिसांच्या तपासात ती बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात रिअल इस्टेट एजंट स्वाती पाटील यांनाही आरोपी करण्याची भीती दाखवून त्यांना गुन्ह्यातून वगळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली. या लाचखोरीला कंटाळून स्वाती पाटील यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
Comments are closed.