मीरा-भाईंदर पालिका सभागृहात नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध; सत्ताधारी भाजपची जाचक एसओपी
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे वृत्तांकन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांवर तसेच कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपने तब्बल १५ पानांची जाचक मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू केली आहे. नागरिकांच्या सहभागावर आणि पत्रकारांच्या वृत्तांकनावर निर्बंध घालणाऱ्या या नियमावलीचा सर्वत्र निषेध होत आहे.
ऑक्टोबर महिन्यातील महासभेदरम्यान काही सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिकांच्या कक्षात घुसून नागरिक आणि पत्रकारांवर हल्ला केल्यानंतर या प्रकाराची तीव्र टीका झाली होती. या घटनेमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही प्रवेशाचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आल्याची टीका केली जात आहे. महासभेचे कामकाज संसद आणि विधिमंडळाप्रमाणे पारदर्शक व्हावे तसेच त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महासभा ही नागरिकांसाठी खुली असणे अपेक्षित असताना नागरिक आणि पत्रकारांच्या प्रवेशावर, उपस्थितीवर तसेच छायाचित्रण आणि वृत्तांकनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल सत्ताधारी भाजप व प्रशासनावर टीका होत आहे.
गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष
शहरात पाणीटंचाई, अनधिकृत बांधकामे, रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी आणि तलावांचे प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्या कायम आहेत. या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी नागरिक आणि पत्रकारांवर निर्बंध लादण्यास प्राधान्य दिले जात असल्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
Comments are closed.