बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याकडून सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी झीशान अख्तर याने ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त आयएएनएसने एक्स पोस्टद्वारे दिले. ही धमकी खरोखरच झीशान अख्तरने दिली आहे की, सेलिब्रिटींना लक्ष्य करण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेला त्रास देण्यासाठी अन्य कोणीतरी त्याच्या नावाचा वापर केला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी झीशान अख्तरकडून धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिस या धमकीचा तपास करत आहेत आणि ती खरोखर अख्तरने दिली होती की कोणीतरी त्याची तोतयागिरी करत आहे याची पडताळणी करत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही यापूर्वी धमक्या आल्या होत्या. त्या प्रकरणात, पोलिसांनी 30 वर्षीय वैभव मिश्रा, बेंगळुरू येथील आयआयटी पदवीधर याला अटक केली, ज्याने धमक्या देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मिश्राचा कोणत्याही टोळीशी संबंध नव्हता: मुंबई पोलिस सूत्रांनी
— IANS (@ians_india) 19 नोव्हेंबर 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी वैभव मिश्रा (वय – 30) याला अटक करण्यात आली होती. तो बंगळुरू येथील आयआयटीचा पदवीधर आहे. त्याचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंध नसल्याचे तपासात समोर आले आहे. एआयचा वापर करून त्याने धमक्या दिल्याचा आरोप आहे.
सैफवर घरात घुसून चाकूने हल्ला
सैफ अली खान याच्यावर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. 16 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास एका घुसखोराने वांद्रे येथील सैफच्या निवासस्थानी प्रवेश केला होता. त्यानंतर तो सैफ आणि करीना कपूर यांचा धाकटा मुलगा जेह याच्या खोलीपर्यंत पोहोचला. मुलाच्या संरक्षणासाठी सैफने घुसखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने सैफवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात त्याच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर सुमारे 6 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर 5 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण नेमके काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (वय – 66) यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा धाकटा भाऊ अनमोल याचेही नाव समोर आले होते. अनमोलला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून हिंदुस्थानात प्रत्यार्पित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. सध्या तो दिल्लीतील तिहार कारागृहात आहे.
Comments are closed.