दुबईतील सायबर गुन्हेगारी टोळीला महाराष्ट्रातून 12 हजार सिमकार्डचा पुरवठा; पुण्यातील मुख्य सूत्रधारासह 7 जणांना अटक
महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दुबईतून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या टोळीला हिंदुस्थानातून तब्बल 10 ते 12 हजार मोबाइल सिमकार्डचा पुरवठा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यामध्ये या रॅकेटचा कथित सूत्रधार सुमन ऊर्फ नानू दासरे याचाही समावेश आहे. ही टोळी हिंदुस्थानातील नागरिकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस तपासानुसार, या सिमकार्डचा वापर सायबर फसवणुकीसाठी करण्यात येत होता. नागरिकांना फोन करून त्यांची फसवणूक करणे, बनावट मोबाइल अॅप्लिकेशन्सची नोंदणी करणे, बँक खात्यांशी मोबाइल क्रमांक जोडून आर्थिक व्यवहार करणे तसेच खोट्या नावांनी ई-मेल खाती तयार करणे, अशा कामांसाठी या सिमकार्डचा वापर केला जात होता. त्यामुळे सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींची खरी ओळख लपवणे शक्य होत होते.
या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार सुमन ऊर्फ नानू दासरे (26) हा पुण्यातील रहिवासी आहे. तो दुबईत राहून एका चिनी नागरिकाच्या मदतीने सायबर फसवणुकीचे जाळे चालवत असल्याचे तपासात समोर आले. त्याला UAE मधून हिंदुस्थानात आणण्यासाठी पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर लूक आऊट सर्क्युलरच्या आधारे त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच सुमन दासरेसह या प्रकरणात सामील असलेल्या आणखी सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती तपासली जात असून, त्यांचा वापर आणखी किती सायबर गुन्ह्यांमध्ये झाला आहे, याचा शोध सुरू आहे.
Comments are closed.