बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याकडून सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी झीशान अख्तर याने ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त आयएएनएसने एक्स पोस्टद्वारे दिले. ही धमकी खरोखरच झीशान अख्तरने दिली आहे की, सेलिब्रिटींना लक्ष्य करण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेला त्रास देण्यासाठी अन्य कोणीतरी त्याच्या नावाचा वापर केला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी वैभव मिश्रा (वय – 30) याला अटक करण्यात आली होती. तो बंगळुरू येथील आयआयटीचा पदवीधर आहे. त्याचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंध नसल्याचे तपासात समोर आले आहे. एआयचा वापर करून त्याने धमक्या दिल्याचा आरोप आहे.

सैफवर घरात घुसून चाकूने हल्ला

सैफ अली खान याच्यावर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. 16 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास एका घुसखोराने वांद्रे येथील सैफच्या निवासस्थानी प्रवेश केला होता. त्यानंतर तो सैफ आणि करीना कपूर यांचा धाकटा मुलगा जेह याच्या खोलीपर्यंत पोहोचला. मुलाच्या संरक्षणासाठी सैफने घुसखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने सैफवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात त्याच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर सुमारे 6 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर 5 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण नेमके काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (वय – 66) यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा धाकटा भाऊ अनमोल याचेही नाव समोर आले होते. अनमोलला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून हिंदुस्थानात प्रत्यार्पित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. सध्या तो दिल्लीतील तिहार कारागृहात आहे.

Comments are closed.