देवणी पोलिसांचा तस्करांना दणका; 25 जनावरांची सुटका, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
सीमावर्ती भागात विक्री व तस्करीच्या उद्देशाने बेकायदा आणि अत्यंत निर्दयीपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर देवणी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 25 म्हशींसह बोलेरो पिकअप आणि मोबाईल असा एकूण 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांची चाहूल लागताच चालक वाहन सोडून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 17 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उदगीरकडून कमालनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोगरी क्रॉसजवळ देवणी पोलिसांनी बोलेरो पिकअप (क्रमांक KA 39 A 3733) थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 20 काळ्या रंगाचे रेडे आणि 5 म्हशी अशी एकूण 25 जनावरे आढळून आली.
जनावरांना वाहनात लाकडी फळ्या लावून कोंबण्यात आले होते, तसेच त्यांचे पाय दोरीने बांधण्यात आले होते. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलिसांची कारवाई सुरू होताच वाहनचालक वाहन जागेवर सोडून पसार झाला. या कारवाईत अंदाजे 8 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप, 50 हजार रुपये किमतीच्या पाच म्हशी, 2 लाख रुपये किमतीचे 20 रेडे आणि 20 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश गणपत गिरी यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात अज्ञात फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरक्षक खोडेवाड, पोलीस कर्मचारी योगेश गिरी, पोलीस कॉन्स्टेबल साई काळे व पोलीस हेडकॉन्स्टेबल तानाजी मुळे यांनी केली.
Comments are closed.