IND Vs NZ 1st Test – मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीतून वगळलं; सुनील गावसकर टीम मॅनेजमेंटवर चिडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करताना दिवसाअखेर न्यूझीलंडने पाच गड्यांच्या मोबदल्यात 243 धावा केल्या आहेत. मात्र, सामना सुरू होताच अंतिम अकरा खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराजचा समावेश न केल्याने मोठी चर्चा रंगली. पहिल्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले, मात्र अनुभवी सिराजला वगळण्यात आले. यामुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वनडेत निर्णायक कामगिरी करून मालिका जिंकून देणाऱ्या आणि मागील वर्षी कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या सिराजला का डावलले गेले, असा सवाल गावसकर यांनी उपस्थित केला आहे. सिराजच्या गोलंदाजीत कोणतीही त्रुटी नसून तो चांगल्या लयीत असल्याचे मत गावसकर यांनी व्यक्त केले. त्याला पाचव्या वनडेत खेळवल्यानंतर तो कसोटीतही खेळेल असे वाटले होते, पण हा निर्णय धक्कादायक ठरल्याचे त्यांनी म्हटले. सिराजने कधीही संघाला निराश केलेले नाही. त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय समजण्यापलीकडचा असून, ज्या गोलंदाजांना संधी मिळाली आहे त्यांनी चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून पुढे मॅनेजमेंटला या निर्णयाचा पश्चात्ताप होणार नाही. ABP ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी सार्थ करून दाखवला. जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत तीन विकेट घेतल्या. अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत न्यूझीलंडला मोठे हादरे दिले. एका बाजूला फलंदाज हजेरी लावून परतत होते, तर दुसरीकडे हॅन्री निकोल्सने एकट्याने खिंड लढवत 221 चेंडूंचा सामना करत 14 चौकारांच्या मदतीने 113 धावांची नाबाद शतकीय खेळी केली. त्याला ग्लेन फिलिप्सने चांगली साथ दिली. फिलिफ्सनेही 182 चेंडूंचा सामना करत संयमी फलंदाजी केली आणि नाबाद 94 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला दिवसाअखेर 5 विकेट गमावत 243 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. आता दुसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर फिलिप्स आणि हॅन्री ही घातक जोडी फोडण्याचं मोठं आवाहन असणार आहे.

Comments are closed.